अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर
कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत. डिसेंबर ते मार्च महिन्यात जोमाने सुरू असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा ओस पडल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्यात मांडवा, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशीद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर हे प्रमुख समुद्रकिनारे, आहेत. रायगड, कुलाबा, जंजिरा, कोर्लई, तळा, सुधागड असे किल्ले आहेत. गांधारपाले, कुडा, कोंढाणा आदी लेण्या आहेत, तर पाली व महाड हे अष्टविनायकातील गणपती आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ सातत्याने असतो.
कोरोनामुळे गेले वर्षभर राज्यात निर्बंध आहेत. त्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे जवळपास सहा महिने रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद होता. सप्टेंबरनंतर हळूहळू निर्बंध शिथिल होत गेले तसा पर्यटकांचा ओघ पुन्हा एकदा वाढू लागला. नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यांत पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत होते. त्यामुळे सहा महिन्यांच्या आर्थिक कोंडीतून पर्यटन व्यावसायिक सावरू लागले होते, पण पुन्हा निर्बंध घालण्यात आल्यामुळे पर्यटक येत नाहीत. परिणामी पर्यटन व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
यापूर्वी शाळा-कॉलेज बंद असल्याने आणि अनेक खासगी आस्थापनांमध्ये वर्क फॉर्म होमची सुविधा देण्यात आल्याने सोमवार ते शुक्रवार या कालावधीतही पर्यटकांची हजेरी लागत होती. वीकेण्डला तर अलिबाग, मुरूड, काशीद, नागाव, आक्षी, किहीम, मांडवा, आवास, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन समुद्रकिनार्यांवर हजारो पर्यटक दाखल होत होते. त्यामुळे हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट, रिसॉर्ट गजबजून जात होते.
समुद्र किनार्यांवर लहानसहान व्यवसाय करणारे व्यवसायिक, खाद्यपदार्थांची विक्री करणारे ठेलेधारक, जलक्रीडा व्यावसायिक, घोडागाडी चालक आणि एटीव्ही चालक यांचीही चांगली कमाई होत होती. रोजगाराच्या संधी यातून उपलब्ध होत होत्या, मात्र मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा होण्यास सुरुवात झाली.
कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेऊन राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू केले. टप्प्याटप्प्याने ते अधिकच कडक होत गेले. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटकांचा ओघ आटत गेला. वीकेड टाळेबंदीमुळे यावर कडीच केली. हॉटेल, लॉजे, रिसॉर्ट सुरू असले तरी पर्यटक येणे बंद झाले आहे, समुद्रकिनारे ओस पडले आहेत.
गेल्या वर्षी जवळपास सहा महिने व्यवसाय बंद होता. नंतरचे पाच महिने पर्यटकांचा ओघ वाढल्याने व्यवसायाला गती मिळत होती. यातून झालेले आर्थिक नुकसान भरून निघण्याची आशा होती, मात्र कोरोनाच्या दुसर्या लाटेने त्या आशेवर पाणी फिरवून टाकले आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.