Breaking News

जंजिरा किल्ला परिसरात नीरव शांतता

लॉकडाऊनमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून येथे दर शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहावयास मिळते. आठवड्याचे दोन दिवस 10 हजारांपेक्षा जास्त पर्यटक जंजिरा किल्ला पाहावयास येत होते, मात्र नेहमी गजबजलेल्या या परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे नीरव शांतता पसरली आहे. सध्या या भागात स्थानिक नागरिकसुद्धा येत नसल्याने सर्वत्र शांतता पाहावयास मिळत आहे.

राजपुरी नवीन व जुनी जेट्टी, तर खोरा बंदर व आगरदांड येथून थेट जंजिरा किल्ल्यावर शिडाच्या बोटीने पोहचवले जात होते. एप्रिल व मे महिना पर्यटकांच्या मोठ्या गर्दीचा असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची व पर्यटकांची मोठी गर्दी असणारे हे स्थळ पर्यटक नसल्याने सुने सुने झाले आहे. शेकडोंच्या संख्येने रांगेत उभी असणारी वाहने आता ओस पडली असून मोठे क्षेत्र असलेले वाहनतळ रिकामे झाले आहे.

जंजिरा किल्ल्यावर शिडाच्या बोटीवर काम करणारे सुमारे 250 कामगार सध्या बेरोजगार झाले असून कोणताही कामधंदा नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. मागील मार्च महिन्यापासून संचारबंदी लागू झाल्याने येथे पर्यटक फिरकत नसल्याने सर्व उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. जंजिरा किल्ल्यावर अवलंबून असणारे छोटे छोटे व्यवसाय गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. येथील सर्व लोक लॉकडाऊन उठण्याची वाट पाहत आहेत. जंजिरा किल्ल्याप्रमाणेच सुप्रसिद्ध काशिद पर्यटनस्थळही पर्यटकांपासून वंचित झाल्याने समुद्र किनार्‍यावर असणार्‍या 74 टपरीधारकांचा व्यवसाय बंद पडला आहे. मुरूड समुद्रकिनारी असणार्‍या 42 टपर्‍याही बंद आहेत. आता 15 मे रोजी तरी लॉकडाऊन संपून उर्वरित 15 दिवसांचा व्यवसाय करण्याची संधी मिळावी, अशी येथील व्यावसायिकांची इच्छा आहे. कारण 1जूनला पाऊस सुरू झाल्यावर सर्व व्यवसाय बंदच असणार आहेत.

दरम्यान, लॉकडाऊन काळात दुकान बंद असले तरी मालक भाडे घेतच आहे. त्यामुळे छोटे दुकानदार कर्जबाजारी झाले आहेत. जून महिन्यात पावसाळा असल्याने सर्व व्यवसाय पर्यटक येथे फिरकत नसल्याने बंदच असतात. तरी मेमधील 15 दिवसांची मोकळीक सर्वांना देण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन संपवून रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी समाजसेवक व शॉपकिपर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जाहिद फकजी यांनी केली आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply