न्यायालय परिसरात पार्किंगबाबत नवे नियम
पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरातील न्यायालयाच्या मार्गावर चारचाकी वाहनांना सोमवार ते शुक्रवार म्हणजेच कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी ’नो पार्किंग’ बाबत आणि दुचाकी वाहनांना ’सम विषम पार्किंग’बाबतची अधिसूचना घोषित करण्यात आली आहे.
न्यायालयीन कामकाजासाठी येणार्या नागरिकांना व या मार्गावरून ये-जा करणार्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. पनवेल शहर वाहतूक शाखेच्या हद्दीतील जिल्हा सत्र न्यायालय लोखंडीपाडा व अशोकबाग आणि पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणर्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी चारचाकी वाहनांना (कार्यालयीन कामकाजाचे दिवशी) नो पार्किंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे या ठिकाणच्या पार्किंगबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
पनवेलमधील वाहतूक कोंडीसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि व्यापारी यांची वेळोवेळी बैठक होते. यामध्ये शहरातील रस्त्यांबाबत विभागवार प्रायोगिक तत्त्वावर उपाय राबविण्यात येत आहेत. त्यानुसारच न्यायालय परिसरातील पार्किंगबाबत नवे नियम बनविण्यात आले आहेत.
पनवेल शहरातील जिल्हा सत्र न्यायालय हे लोखंडीपाडा व अशोकबाग यांच्यामधुन पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर आहे तसेच जिल्हा सत्र न्यायालय हे पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर आहे. न्यायालय सध्या कार्यरत असलेल्या रस्त्याची अंदाजे लांबी 150 मीटर व अंदाजे रुंदी 40 फुट इतकी आहे. न्यायालयाच्या आजुबाजुला असलेले हॉस्पीटल व शासकीय कार्यालये या ठिकाणी लोकांची वर्दळ जास्त असल्याने त्याचा थेट परिणाम न्यायालयाच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर होतो. आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहीका, अग्नीशमन अशा अत्यावश्यक सेवा असलेल्या वाहनांना अडथळा होण्याचे अनेक प्रसंगही घडतात. या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या आदेशानुसार, या मार्गावर चारचाकी वाहनांना पार्किंग करण्यासंबंधी सक्त मनाई करण्यात आली आहे तर दुचाकींना सम-विषम नियमाने वाहने पार्किंग करणे बंधनकारक आहे. पार्किंगबाबतचे नवे नियम लागू झाल्यास याठिकाणी येणार्या नागरिकांना वाहतूक कोंडीच्या अडचणी उद्भवणार नाहीत.