Breaking News

पोलिसांसोबत राबणारे होमगार्डस् मानधनाच्या प्रतीक्षेत

उदरनिर्वाहाचा प्रश्न

पनवेल : वार्ताहर

लॉकडाऊनची अंमलबजावणी, सण, उत्सव, यात्रा जत्रांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांच्या बरोबरीने राबणारे म्हणून होमगार्डकडे पहिले जाते. त्यांनी मागील वर्षांपासून पोलीस दलाला मोठी साथ केली आहे. या वेळीही ते लॉकडाऊन अंमलबजावणीच्या उपाययोजनात आघाडीवर आहेत, मात्र या होमगार्ड चार-पाच महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील सुमारे 100 ते 200 जणांना राज्य शासनाकडून मानधनच मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकीच्या पेट्रोलसाठीही उसनवारी करायची वेळ आली आहे. पनवेल परिमंडळ 2मध्ये 40 होमगार्ड चोखपणे कार्य बजावित आहेत.

लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. सातत्याने बंदोबस्तासह विविध प्रकारची कामे त्यांना करावी लागतात. त्यासाठी होमगार्डना त्यांच्या कामावर आधारित मानधन दिले जाते. मागील वर्षापासून पोलिसांना कोरोनाच्या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीत होमगार्डची मोठी मदत झाली आहे. यंदाही कोरोनाच्या संसर्ग वाढल्याने कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांना होमगार्ड मदत करीत आहेत. पोलिसांच्या बरोबरीने तेही रात्र दिवस रस्त्यावर उभे राहत आहेत. त्यामुळे पोलिसांचा टॅन काहीसा हलका झाला आहे.

रायगडमध्ये सुमारे 100 ते 200 होमगार्ड कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. त्याबरोबर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 विभागामध्ये 40 होमगार्ड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. मात्र त्यांना डिसेंबर 2020 पासून मानधनच मिळालेले नाही होमगार्डपैकी बहुतांशजण हे आर्थिक स्थिती बेताची असलेल्या कुटुंबातील आहेत. त्यांना महिन्याच्या मानधनावर कुटुंब चालवावे लागत आहे. मात्र पाच महिन्यांपासून, तर काहींचे चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे कुटुंबांचा चरितार्थ कसा चालवायचा हा प्रश्न उभा आहे. राज्य शासनाने तातडीने त्यांना मानधन देण्याची गरज आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply