नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडत आहे. ऑक्सिजनची कमतरता तसेच लसीचा तुटवडा यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. अशा परिस्थितीत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून पालिकेला दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
लस खरेदीसाठी एक कोटी तर उर्वरित 50 लाख ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी विनियोग करावा, अशा आशयाचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले आहे. शहरात 50 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. लसीकरणाबाबत सध्या नागरिकांत मोठ्या प्रामणात जागरूकता आल्याचे दिसून येते. विशेषत: ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी मोठ्या प्रामणात बाहेर पडत आहेत. तसेच 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांनाही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. असे असले तरी लसींचा आवश्यक तेवढा पुरवठा होत नसल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. अनेकदा लसीअभावी केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. शहरातील प्रत्येक घटकाला लस घेता यावी, या उद्देशाने मंदा म्हात्रे यांनी सक्रिय पुढाकार घेतला आहे.
पालिकेला एक कोटी रुपयांचा आमदार निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना दिले आहे. दरम्यान, म्हात्रे यांनी आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी यापूर्वीही पालिकेला आमदार निधी उपलब्ध करून दिला आहे. नवी मुंबई ही श्रीमंत महापालिका आहे. त्यामुळे महापालिकेने लस खरेदीबरोबरच ऑक्सिजनचे स्रोत निर्माण करण्यावर भर द्यायला हवा. त्याची सुरुवात म्हणून ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी 50 लाख रुपयांचा आमदार निधी खर्च करण्याची अनुमती मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांना दिली.