मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनातील काहीच कळत नाही. त्यांनी विकासकामांना स्थगिती देऊन विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे जनतेचे सरकार नसून स्थगिती सरकार आहे, असा हल्लाबोल करतानाच राज्याला पोषक नसलेले तीन पक्षांचे पाहुणे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी रविवारी (दि. 8) केला.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होणार आहे. 10 दिवस झाले तरी नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी झाला नाही. सहा मंत्र्यांना अजूनही खाती दिलेली नाहीत. राज्याच्या हिताचा एकही निर्णय घेण्यात आला नाही. केवळ मेट्रोसारख्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. मी तर म्हणतो, हे स्थगिती सरकारच आहे, अशी टीका राणे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा काहीच अनुभव नाही. त्यांनी कुठल्याही संस्थेत काम केलेले नाही. त्यामुळे त्यांना प्रशासनातील एबीसीडीही कळत नाही, असा टोला राणे यांनी हाणला. या वेळी राणे यांनी त्यांच्या आगामी दौर्याचीही माहिती दिली. 15 ते 18 ऑक्टेबरपर्यंत आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये गावागावांना भेटी देणार आहोत. या भेटीदरम्यान जनतेला भाजप सरकार स्थापन का करू शकले नाही, तसेच तीन पक्षांचे सरकार राज्याला कसे पोषक नाही यासंबंधीची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नव्या सरकारकडून विकासकामांना खीळ बसविली जात असल्याबद्दल जनतेत जागृती निर्माण केली जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.