Breaking News

आजारी असूनही दि. बा. पाटील लढ्यात अग्रभागी

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ दिवसेंदिवस वाढत होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेने सारा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. लोकनेते दि. बा. पाटील या चळवळीत सतत सहभागी होत होते. लोकांना संघटित करीत होते. दिवसरात्र हाच विचार त्यांच्या मनात होता.
शेवटी अतित्रासामुळे ‘दिबा’ आजारी पडले. प्युरोसी हा आजार त्यांना झाला. या आजारामुळे त्यांच्या फुप्फुसात पाणी झाले. त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे डॉ. नेने यांनी त्यांच्या फुप्फुसातून साधारण दीड लिटर पाणी काढले, तेव्हा त्यांना बरे वाटले, पण हा आजार बळावू नये यासाठी डॉक्टरांनी त्यांना काही महिने पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. असे असले तरी या आजारपणातही त्यांचे लक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडेच ह़ोते. ते सतत या चळवळीची माहिती घेत. या काळात त्यांचा मुक्काम मुंबईत दादर येथे सासुरवाडीला ह़ोता.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ मुंबईत जोरात सुरू होती. 1955-56मध्ये मुंबईत झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 106 जणांना हौतात्म्य आले. आजारपणामुळे मुंबईतील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर दि. बा. पाटील पुन्हा पनवेलमध्ये परतले व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी झाले.
1957 सालच्या निवडणुकीनंतर यशवंतराव चव्हाण हे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले, पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा भडका वाढतच होता. त्यात काँग्रेस होरपळून निघत होती. 30 नोव्हेंबर 1957 रोजी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू येणार होते. त्यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शने करण्याचे ठरविले. त्यानुसार वाई व पोलादपूर मार्गावर लाखोंच्या संख्येने निदर्शक जमा झाले आणि त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या सार्‍या घटनेची दखल घेऊन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व इतर नेत्यांशी चर्चा केली, तसेच गिरणी कामगारांचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्याशी फोनवरून परिस्थितीची माहिती घेऊन मुंबई काँग्रेसच्या हातून जाऊ नये यासाठी नाईलाजाने पंडित नेहरूंनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची 1 मे 1960 रोजी घोषणा केली. या घोषणेमुळे महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबईत तर दिवाळी साजरी झाली, मात्र ही घोषणा करताना मराठी भाषिकबहूल असलेला बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणी हा भाग कर्नाटकात घालण्यात आला. त्यामुळे तेथील मराठी भाषिक नाराज झाले. महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी आजही ते लढत आहेत.
दि. बा. पाटील यांनी सीमा बांधवांचा प्रश्न अनेकदा विधानसभेत उपस्थित केला. बेळगाव, कारवारमधील सीमा बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी शासनाने पावले उचलावी याकरिता 28 मार्च 1969 रोजी प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापने विधानसभेवर भव्य मोर्चा काढला. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी दि. बा. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
असे हे झुंजार नेते जनतेच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी आक्रमक होऊन लढ्याला तयार होत असत. अन्यायाविरुद्ध लढणं, संघर्ष करणं हा दि. बा. पाटील यांचा जणू स्थायीभाव ह़ोता. त्यामुळेच ते लोकनेते झाले.

  • दीपक रा. म्हात्रे , ज्येष्ठ पत्रकार

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply