Breaking News

केशरी रेशनकार्डधारकांचे स्वस्त धान्य बंद

अन्न नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयामुळे लाभार्थी अडचणीत

कर्जत : बातमीदार

अंत्योदय तसेच दारिद्र्य रेषेखालील आणि एपील म्हणजे प्राधान्य गट यातील सर्वच लाभार्थीना स्वस्त धान्य विक्री दुकानात कोरोनाच्या काळात धान्य मिळत असे. मात्र मागील दोन महिन्यांपासून एपील गटातील म्हणजेच केशरी रेशनकार्डधारकांना धान्य देणे बंद करण्यात आले आहे. यामुळे या गटातील रेशनकार्डधारकांची अवस्था दयनीय झाली आहे.

केशरी रेशनकार्डधारक जेव्हा स्वस्त धान्य दुकानात जातात, तेव्हा मागील दोन महिन्यांपासून मालाचा पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. फक्त अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांपुरतेच अन्नधान्य वरून पुरविले जात असल्याचे दुकानदारांकडून सांगितले जाते. कोरोनाच्या काळात भल्याभल्यांची आर्थिक कोंडी होऊन त्यांची घडी विस्कटली आहे. त्यात या केशरी रेशनकार्डधारकांची अवस्था वेगळी नाही. बंद पडलेले व्यवसाय, बुडालेला रोजगार, पगारास होत असलेला विलंब आदी कारणामुळे या प्राधान्य गटातील कुटुंबांची आधीच आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत अन्न नागरी पुरवठा विभागाने या प्राधान्य गटातील म्हणजे केशरी रेशनकार्डधारकांना धान्य देणे बंद केल्याने या कार्डधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अडचणी येत आहेत.

शासनानानेच केशरी रेशनकार्डधारकांना धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय मागील दोन महिन्यांपासून घेतला आहे. त्यामुळे आता फक्त अंत्योदय आणि दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांना स्वस्त धान्य पुरविले जात आहे.

-संजय तवर, पुरवठा निरीक्षक, कर्जत

कोरोनाच्या काळात आमची आर्थिक घडी विस्कटली आहे. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यास काही काळ लागणार आहे. त्यामुळे कोरोना काळात जसे धान्य दिले जात होते ते देण्यास पुन्हा सुरु करावे.

-शशिकांत वाडकर, केशरी कार्डधारक, कर्जत

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply