महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मागणीला यश
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राइव्ह इन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पनवेल मनपाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याअनुषंगाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध कोविड लसीकरण केंद्रावरती 45 वर्षांवरील दिव्यांग बांधवासाठी लसीकरणाची विशेष सोय पालिकेच्या वतीने मंगळवार (दि. 18)पासून करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांचे लसीकरण सुलभतेने व्हावे यासाठी महापालिकेने केली ‘ड्राइव्ह इन लसीकरणाची’ सोय केली आहे.
मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावे, अशा मागणीचे पत्र भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना निवेदन देऊन यासंदर्भात मागणी केली होती. यानुसार 45 वर्षांवरील सर्व दिव्यांग बांधवांनी सायंकाळी 4 ते 5 यावेळेत लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
दिव्यांग बांधवांचे सुलभेतने कोविड लसीकरण व्हावे यासाठी महापालिकेने विशेष काळजी घेतली आहे. यासाठी 45 वर्षांवरील दिव्यांगाची यादी बनविण्यात आली असून 304 दिव्यांग बांधवाचा रहिवासी पत्ता लक्षात घेऊन त्या त्या परिसरातील लसीकरण केंद्र त्यांना नेमून देण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांनी लसीकरणाची अपाँईमेंट नेमून दिलेल्या केंद्रावर वेळेवर उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने
करण्यात आले आहे.
दिव्यांग बांधवांनी लसीकरण करण्यास जाताना आपल्या सोबत आपले आधार कार्ड किंवा फोटो असलेले ओळखपत्र सोबत बाळगावे, तसेच दिव्यांग बांधवांच्या हालचालीवर मर्यादा असल्यास त्यांनी वाहनाच्या बाहेर पडू नये. अशांना चारचाकी वाहनामध्ये लसीकरण केले जाईल. मात्र लसीकरण पूर्ण झाल्यानंतर अर्धा तास वाहन लसीकरण केंद्राजवळ थांबले पाहिजे. अशा सूचना महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. दिव्यांग बांधवाच्या लसीकरणाची यादी महापालिकेच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर खात्यावरती जाहीर करण्यात येणार आहे.