Breaking News

निवृत्तीचा विचार नाही -रोनाल्डो

तुरिन : वृत्तसंस्था

वाढते वय यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निवृत्तीविषयीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत, मात्र आपण यापुढेही खेळत राहणार असल्याचे स्पष्ट करीत रोनाल्डोने युव्हेंटस आणि आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे.

‘मी अद्याप निवृत्तीचा विचार केलेला नाही. वाढते वय हे फक्त आकडे आहेत. 34, 35 किंवा 36व्या वर्षी कारकीर्दीचा शेवट होतो, असा त्याचा अर्थ होत नाही. मी माझ्या कामगिरीने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे. मी ज्या प्रकारे खेळत आहे, ज्या पद्धतीने खेळाविषयी विचार करीत आहे, खेळातील अचूकता यामुळे मी अधिक परिपक्व झालो आहे,

असे मला वाटते,’ असे रोनाल्डोने सांगितले.

‘मी सध्या फुटबॉलबाहेरील गोष्टींचा आनंद लुटत असून, पुढील एक किंवा दोन वर्षांत काय होईल हे मला माहीत नाही,’ असे रोनाल्डोने काही दिवसांपूर्वी मुलाखतीत म्हटले होते. तेव्हापासून रोनाल्डोच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे, पण रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक फुटबॉलमधील 700व्या गोलची नोंद केली होती, तसेच त्याला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी दिल्या जाणार्‍या बलॉन डीऑर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे.

बलॉन डीऑर पुरस्कारासाठी मेस्सी, रोनाल्डो, डिकमध्ये रंगत

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी दिल्या जाणार्‍या बलॉन डीऑर पुरस्कारासाठी यंदा लिओनेल मेस्सीसमोर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि विर्जिल व्हॅन डिक यांचे आव्हान असणार आहे. ब्राझीलचा नेयमार मात्र या शर्यतीत नसेल. या पुरस्कारासाठी 30 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यातून जवळपास अडीच वर्षे पॅरिस सेंट-जर्मेनचे प्रतिनिधित्व करणार्‍या नेयमारचे नाव वगळण्यात आले होते. या पुरस्कारावर असलेली मेस्सी आणि रोनाल्डो यांची हुकूमत गेल्या वर्षी लुका मॉड्रिचने मोडीत काढली होती. मॉड्रिचने रेयाल माद्रिद आणि क्रोएशियाच्या यशात मोलाचा वाटा उचलला होता. 2 डिसेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण पॅरिसमध्ये केले जाणार आहे.

आम्हाला सेरी-ए तसेच चॅम्पियन्स लीग करंडक उंचवायचा आहे. युव्हेंटसने मोठी स्वप्ने पाहायला हवीत. आम्हाला सर्व स्पर्धा जिंकायच्या आहेत. हे कठीण आहे, पण या जगात अशक्य असे काहीच नाही.

-ख्रिस्तियानो रोनाल्डो

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply