Breaking News

चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान

राज्य शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी

मागील दोन वर्षांपासून मच्छीमार बांधवावर मोठे आघात झाले. दोन वादळे, कोरोनाचा संसर्ग यामुळे मच्छीमार बांधवांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातून कुठे सावरतोय तोच तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांची झोप उडवली आहे. या सार्‍या घटनांमुळे मच्छीमार बांधव हातघाईला आला आहे. त्यातून राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.त्यातच आताच्या वादळातदेखील मच्छीमारांची मोठी हानी झाली आहे. म्हणून राज्य शासनाने तत्काळ बाधित मच्छीमारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजप मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.चेतन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर शासनाकडे कोळी महासंघाकडून अनेकदा मागणी करण्यात आली, पण राज्य शासनाने मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली. आता तौक्ते वादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर आदी जिल्ह्यातील मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये होड्या, जाळे, घरे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हणून मत्स्यविकास मंत्री व जिल्हाधिकार्‍यांनी लवकर भरपाई द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

वादळमुळे मागील दोन वर्षात अनेक मच्छीमार बेपत्ता झाले आहेत, तर काही मच्छिमार मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयाची मदत त्वरित राज्य सरकारने करावी. ज्यांचे बोटींचे, जाळ्यांचे, घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे अशांना त्वरित आर्थिक मदत सरकारने करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलच्या वतीने हे सर्व मच्छीमार बांधव मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय आता शांत बसणार नाहीत, असे भाजप मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चेतन पाटील म्हटले आहे.

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा उरण तालुक्यातील मच्छीमारांनाही बसला असुन मासेमारी करून परतलेल्या 150 बोटी ससुनडॉक आणि मोरा बंदरात अडकून पडलेल्या आहेत.तर चक्रीवादळाची सुचना मिळताच मासेमारी अर्ध्यावर सोडून माघारी परतलेल्या सुमारे 300 बोटी सुरक्षिततेसाठी विविध बंदराच्या आश्रयाला गेल्या आहेत. मासेमारी अर्ध्यावर सोडून माघारी परतल्यामुळे मच्छी मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी दिली आहे.

संचारबंदी लागू झाल्यानंतर पुन्हा 1 जुन 2021 पासुन राज्यातील मच्छी मच्छिमारांसाठी पावसाळी मासेमारी बंदीचा काळ सुरू होणार आहे. याधीच लागोपाठच्या सहा चक्रीवादळाचा जबरदस्त परिणाम मासळी व्यवसायावर झाला. त्यातच नव्याने आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा उरण तालुक्यातील मच्छीमच्छिमारांनाही बसला आहे. तौक्ते  चक्रीवादळामुळे करंजा, मोरा येथील मासेमारी करून परतलेल्या आणि टनावारी मासळीने भरलेल्या 150 मच्छिमार बोटी विविध बंदरात नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत.

यामध्ये ससुनडॉक बंदरात 100 तर मोरा बंदरात मासळीने भरलेल्या 59 बोटींचा  समावेश आहे, तर चक्रीवादळाच्या सुचनेपुर्वी खोल समुद्रात उरण परिसरातील सुमारे 350 ते 400 मच्छीमार बोटी खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी निघाल्या होत्या, मात्र येऊ घातलेल्या ताऊक्ती चक्रीवादळाच्या धोक्याच्या इशार्‍यानंतर खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी निघालेल्या 350 ते 400 मच्छीमार बोटी मासेमारी अर्ध्यावर सोडून माघारी परतल्या आहेत. चक्रीवादळापासुन सुरक्षितेसाठी नजीकच्या किनारा गाठीत मिळेल त्या बंदरात मच्छीमार बोटी नांगर टाकून स्थिरावल्या आहेत.

यापैकी 325 बोटी उरणच्या मोरा बंदरात तर दिघी बंदरात 75 बोटींची आश्रय घेतला आहे. खोल समुद्रातील मासेमारी अर्ध्यावर सोडून माघारी परतलेल्या बोटींचा लाखो रुपये इंधन, बर्फ, खलाशी आणि इतर साधनसामग्रीवर केलेला खर्च अगदी वाया गेला आहे. यामुळे मच्छी मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी एका ट्रीपसाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो. 1 जून 2021 पासून पावसाळी मासेमारीचा बंदीचा कालावधी सुरू होणार आहे. त्यामुळे वादळ शमलं तरी आता उरलेल्या आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारीची खेप शक्य होणार नाही. यामुळे पावसाळी मासेमारी बंदी पुर्वीच मासेमारी हंगाम संपुष्टात आला असल्याची माहिती करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी दिली आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply