महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्याकडून सुविधा
महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील तीन आदिवासी वाड्यांना महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्या मार्फत पाणी साठवण टाक्या भेट देण्यात आल्या.
पाणी साठा करण्याची समस्या महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्या माध्यमातून दूर करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे.
महाड तालुक्यांतील दुर्गम भागात वसलेल्या वाड्यांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. अशा वाड्यांना स्थानिक प्रशासनाकडून पाण्याचा टॅकर दिला जातो मात्र हे पाणी साठवण करण्याची उपाययोजना या वाड्यांमध्ये नसते. महाड तालुक्यातील वारंगी गाढवखडक, रायगडवाडी आणि कोळी आवाड या तीन वाड्यांतील पाणी साठा करण्याची समस्या लक्षात घेऊन महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्या मार्फत तेथील ग्रामस्थांकडे पाणी साठवण टाक्या सुपूर्द करण्यात आल्या.
शहरातील रत्नदिप ज्वेलर्सचे मालक बाबुलाल जैन हे तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांना पिण्याची टाकी उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून राबवित आहेत. या कामी भारतीय जैन संघटनेच्या महाड शाखेचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, उदय सावंत, मिलिंद माने, प्रभाकर सावंत, विजय कोळसकर, विजय खोपकर, जयवंत वाडीकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.