Breaking News

चक्रीवादळाचा धडा

तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग आणि जागरूक नेतृत्व यांचा समन्वय असला की मोठमोठी संकटेदेखील परतवता येतात हा धडा तौत्के चक्रीवादळाने जाता-जाता आपल्याला दिला आहे. फक्त वादळाच्या मार्गावर लक्ष ठेवून केंद्र सरकार थांबले नाही. या वादळाने ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याची फळे लवकरच आपल्याला दिसतील अशी अपेक्षा आहे. कारण या नैसर्गिक आपत्तीमुळे अक्षरश: हजारो लोकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. अनेक मच्छीमारांची घरे आणि होड्या या दोहोंची वाताहत झाली आहे.

हवामान खात्याचा अंदाज हा अनेक वर्षे आपल्याकडे विनोदाचा विषय ठरत आला आहे. प्रचंड पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला की छत्री घरात ठेवून बाहेर पडायला हरकत नाही अशा नजरेने हवामानविषयक अंदाजांकडे पाहिले जात असे. आता मात्र तशी परिस्थिती उरलेली नाही. सुप्रसिद्ध हवामानतज्ज्ञ व संशोधक डॉ. वसंत गोवारीकर यांनी सर्वप्रथम भारतीय हवामानाचे विशेषत: प्रर्जन्यमानाचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेेषण करून नवा पायंडा पाडला. आता तर हवामान खात्याला अत्याधुनिक उपग्रहांच्या अव्याहत सेवेचा रतीब सुरू असतो. त्यामुळे पाऊसपाणी, हवामानातील बदल आणि चक्रीवादळांचे तडाखे यांचा बर्‍यापैकी अचूक अंदाज घेता येतो. तौत्के चक्रीवादळ हे त्याचे ताजे उदाहरण. तब्बल पाच दिवस आधीच हवामान संशोधकांना या चक्रवाताची चाहूल लागली होती. तेव्हा तो अरबी समुद्रामध्ये पाचशे किमीहून अधिक दूर होता, परंतु वार्‍याचा वेग आणि चक्रवाताची क्षमता याची अचूक पाहणी करून उपग्रहांनी त्याचा पुढील मार्गदेखील शोधून काढला. भारताच्या किनारपट्टीवर तौत्के चक्रीवादळ नेमके कुठे आणि कधी आदळणार हेदेखील आधीच कळले. त्यामुळे योग्य ती पूर्वतयारी करून वादळाला तोंड देणे काहिसे सुकर झाले. एनडीआरएफच्या तुकड्यांनी गुजरातच्या किनारपट्टीवर अवघ्या दोन दिवसांत लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले. एनडीआरएफ आणि अन्य सुरक्षा व्यवस्थांनी यात भारतीय नौदलदेखील आले, जिवाची बाजी लावून प्रचंड मोठी जीवितहानी टाळली. या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा विशेषत: गुजरात आणि महाराष्ट्राला बसला. यामध्ये महाराष्ट्रात नऊ आणि गुजरातमध्ये सात बळी गेले. चक्रीवादळाचा जोर पाहता जीवितहानी तुलनेने कमी झाली असली तरी मालमत्तेची हानी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेही तौत्के चक्रीवादळाच्या वाटचालीवर आणि संभाव्य नुकसानीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. महाराष्ट्र, गुजरात, केरळ, गोवा आदी पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क ठेवून आपत्ती व्यवस्थापनावर त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले. या दोघा सर्वोच्च नेत्यांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळेच तौत्के चक्रीवादळाने केलेला आघात काही प्रमाणात निभावता आला असेच म्हणावे लागेल. अर्थात वादळाचा फटका बसलेल्या हजारो नागरिकांना तातडीच्या मदतीची नितांत गरज आहेच व ती त्यांना मिळालीच पाहिजे. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळात सापडलेल्या कोकणवासीयांना महाविकास आघाडीने ठेंगा दाखवला. ते पुन्हा उगाळण्याची ही वेळ नाही, परंतु गेल्या वेळच्या चुका टाळून ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील गोरगरीब वादळग्रस्तांना तत्परतेने आर्थिक साह्य द्यावे एवढीच अपेक्षा आहे. त्यासाठी सवयीप्रमाणे केंद्र सरकारकडे हात पसरण्याची संधी साधली जाऊ नये.

Check Also

संगीतकार राजेश रोशन 50 वर्षांचे करियर : एक रास्ता है जिंदगी…

यश चोप्रा निर्मित व रमेश तलवार दिग्दर्शित दुसरा आदमी (1977) या चित्रपटातील चल कहीं दूर …

Leave a Reply