Breaking News

रंगांच्या दुनियेत हरवलेला कलाकार मदतीच्या प्रतीक्षेत

संधी तुमचे दार कधी ठोठावेल ते सांगता येत नाही. आलेल्या संधीचे सोने करणे की, माती करणे हे प्रत्येकाच्या हातात असते. ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्यातील कलागुण व्यक्त करण्याची संधीच लाभत नाही. पण गुणी कलाकार प्रतिकुल परिस्थितीतही आपल्या कलेची छाप पाडल्याशिवाय राहत नाही. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील एक गरीब होतकरु रंगावलीकार अनिरुद्ध संदिप खेडेकर! ज्याने शुन्यातून विश्व निर्माण केले आहे. ज्याने चितारलेल्या एका रांगोळीची आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् मधील परिक्षकांना नोंद घ्यावी लागली. ग्रामिण भागातील या कलाकाराने अवघ्या आशिया खंडातील रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोणे एकेकाळी दक्षिणेकडील एका कोपर्‍यात खितपत पडलेल्या परंतु निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मुरुड या सौंदर्यस्थळाला साळाव खाडीवरील पुलाचा जणू परिसस्पर्श झाला. आणि हा परिसर मुंबईपासून जवळ आला. परिणामी या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे व्दार नजीक आले. कलाकार मंडळींनाही आपली कला सादर करण्याची संधी प्राप्त झाली. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि नैसर्गिक सौंदर्याने भारलेल्या मुरूड परिसरातील  तरुण आपले नशीब आजमावण्यासाठी शहरांकडे जाऊ लागले. तेथे त्यांच्या शिक्षणाबरोबरच कलागुणांना उत्तेजन मिळाले. स्वतःला सिध्द करण्याची संधी मिळाली. अनिरुध्द हा असाच एक कलासक्त, परिस्थितीने गरीब परंतू होतकरु कलाकार! तीन-चार वर्षापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने वडिल गेले. आपल्या आई व बहिणीला सावरत अनिरुध्दने  इंजिनियरींगचा डिप्लोमा  पूर्ण केला. सुरत येथील एका कंपनीत तो कामाला लागला.कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम करीत असतांनाही रंगांची साथ त्याने कधीच सोडली नाही.

नांदगावचे हौशी रंगावली कलाकार व मूर्तीकार सतिश केशव जोशी हे मुंबई लालबागचे प्रसिध्द मूर्तीकार विजय खातू यांच्याकडे काम करीत असतांना, त्यांच्याशी असलेले घरोब्याचे संबंध जपत अनिरुध्द कलेकडे ओढला गेला.

सतिश जोशींनीच त्याला रंगांचे वैभव दाखवून देताना त्याच्यातील कलाकाराला घडवले. मातीतील या हिर्‍याला पैलू पाडले. कला ही स्वतःसह इतरांनाही आनंद मिळवून देते.

रांगोळी असो की मूर्तीकला दोन्हींना गरज असते ती स्थिरतेची, आत्मसंयमनाची, एकाग्रतेची व सौंदर्याचे पुजारी बनण्याची. हे जोशी यांनी अनिरुध्द याच्या मनावर बिंबवले, त्याला उत्तेजन दिले आणि अनिरुध्द रंगांचा पुजारी बनला!

सतिश जोशींसह रंगावलीकार मित्र जयंत शिगवण, अक्षय शहापूरकर व अन्य सहकार्‍यांसह अनिरुध्द याने मुंबई, नेरळ, वाशी-नवी मुंबई, कर्जत, मुरुड जंजिरा, नांदगाव, अलिबाग अशा अनेक ठिकाणी रांगोळ्या साकारल्या. त्यात छत्रपती शिवराय, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, वीर योध्दा तानाजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, इंदिरा गांधी, बॅ. अंतुले, वसंतराव नाईक, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजींपासून सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, महेश काळे यांच्या रांगोळ्या आकर्षक ठरल्या तर अनेक निसर्ग देखावे, गड, किल्ले स्त्रीभ्रूण हत्या, आई, कुपोषण, गरीबी, संत परंपरा या विषयांवरील त्याच्या रांगोळ्यांनी प्रेक्षकांना विचारप्रवण केले.

अनिरुध्दला नॅशनल ऑनलाईन अ‍ॅन्युअल आर्ट प्रदर्शन 2020, आधार अपंग संस्था (नेरूळ, नवी मुंबई), बत्तिसावे रस्ता सुरक्षा अभियान, राजगुरु युथ फेस्टीव्हल रांगोळी स्पर्धा, मुरुड जंजिरा पर्यटन महोत्सव, नांदगाव पर्यटन महोत्सव, मुरुड तालुका फोटोग्राफर्स असोसिएशन आयोजित स्पर्धा, अशा एक ना अनेक पारितोषिकांसह सन्मानांनी गौरविले आहे. 17 मार्च 2021 रोजी 36 मिनिटे 39 सेकंदात छत्रपती संभाजी महाराजांची पोर्ट्रेट रांगोळी पाण्याखाली काढून अनिरुध्दने विक्रम केला.

अंडर वॉटर पोर्ट्रेट काढणार्‍यांची नोंद करणार्‍या आशिया खंडातील बुक ऑफ रेकॉर्डस्ने अनिरुध्दने काढलेल्या  लहानात लहान चार बाय चार सें.मी. आकाराच्या रांगोळीची दखल घेऊन, आशिया बुकात स्थान दिले आहे. आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्ने त्याला गौरवितांना अशी अंडर वॉटर पोर्ट्रेट (रांगोळी) जागतिक पातळीवर  कोणी साकारलेली नाही, असे म्हटले आहे. त्याच्या या कलाकृतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी त्याला एका ’मॅजिक टच्’ची गरज आहे.! 

 वेळीच कदरदान मिळाले तर कला फलश्रुत होते. अनिरुद्ध खेडेकर या कलाकारांला शासन अथवा दानशूर व्यक्तींनी शाबासकीची थाप आणि भक्कम पाठबळ दिले  तर भविष्यात निश्चित तो अवघे जग कवेत घेईल, गरज आहे मदतीची.

-संजय करडे, खबरबात

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply