Breaking News

हॅम रेडिओ ऑपरेटर्सची मोलाची कामगिरी; तौक्ते चक्रीवादळात प्रशासनाला केले सहकार्य

अलिबाग : जिमाका

तौक्ते चक्रीवादळाच्याकाळात क्षेत्रीय स्तरावरून महत्त्वाच्या माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी हॅम रेडिओ ऑपरेटर्सचे जिल्हा प्रशासनाला मोलाचे सहकार्य मिळाले. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उभारलेल्या वायरलेस यंत्रणेचे काम हॅम रेडिओ ऑपरेटर यांनी पाहिले व प्रशासनास मदत केली. 16 व 17 मे रोजी जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला, त्या वेळीही हॅम रेडिओ यंत्रणेने  प्रशासनाला सहकार्य केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्या मार्गदर्शनानुसार हॅम रेडिओ ऑपरेटर दिलीप बापट व त्यांचे सहकारी अमेय आठवले, अमित गुरव व नितिन ऐनापुरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोलीस विभागाने उभारलेल्या वायरलेस तसेच हॅम रेडिओ यंत्रणेद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील माहिती घेऊन ही माहिती तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास दिली. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वायरलेस शाखा) आर. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. हॅम रेडिओ ऑपरेटर टीमद्वारे आपत्तीच्या काळात प्रशासनास नेहमीच मदतीचा हात दिला जातो. मागील वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटकाळातदेखील ही टीम प्रशासनाच्या मदतीला धावली होती. संपर्क यंत्रणा कोलमडली असताना हॅम रेडिओ यंत्रणेच्या माध्यमातून प्रशासनाला क्षेत्रीय स्तरावरील नुकसानीची माहिती तात्काळ प्राप्त होऊ शकली होती. ज्यांना स्वयंसेवक म्हणून हॅम रेडिओ ऑपरेटिंग शिकण्याची इच्छा आहे तसेच ज्यांना हॅम रेडिओ बाबत अधिक माहिती हवी आहे, त्यांनी 9860946395 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ज्येष्ठ हॅम रेडिओ तज्ज्ञ व ऑपरेटर दिलीप बापट यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply