बीसीसीआयकडून इंग्लंड बोर्डाला पत्र
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (इसीबी) पत्र लिहिले असून आयपीएलसाठी वेळ मिळावा यासाठी कसोटी मालिका निर्धारित वेळेच्या एक आठवडा आधी खेळवली जावी, अशी विनंती केली आहे.
कोरोना संकटामुळे आयपीएल अर्ध्यातच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढवली. परिस्थितीनुसार आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला लिहिलेल्या पत्रात भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका एक आठवडा आधी खेळवली जावी, अशी विनंती केली आहे. नियोजित वेळेनुसार 4 ऑगस्टला पहिली कसोटी खेळली जाणार आहे. बीसीसीआयच्या मागणीवर अद्याप इंग्लंड बोर्डाकडून उत्तर आलेले नाही.
7 सप्टेंबरपर्यंत कसोटी मालिका संपावी अशी बीसीसीआयची अपेक्षा आहे, जेणेकरून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्या टी-20 वर्ल्डकपच्या आधी आयपीएल खेळवण्याची संधी मिळेल. सध्याच्या नियोजित वेळेनुसार 14 सप्टेंबरला कसोटी मालिका संपणार आहे.
भारतीय संघ इंग्लंडलमध्ये सहा कसोटी सामने खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसोबत होणार आहे. 18 जून रोजी हा सामना खेळला जाईल. यानंतर इंग्लंडसोबत पाच सामन्यांची मालिका असेल. इंग्लंडसाठी प्रवास करण्याआधी भारतीय संघाला मुंबईत विलगीकरणात ठेवले जाईल.
इसीबी म्हणते…
आम्ही बीसीसीआयसोबत विविध गोष्टींवर चर्चा करीत आहोत. यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण होणार्या अडचणींचा समावेश आहे, पण सामन्याच्या तारखा बदलण्यासंदर्भात अधिकृत विनंती करण्यात आली नाही. आम्ही पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार पाच सामने आयोजित करू, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (इसीबी) प्रवक्त्याने सांगितले.