पुणे : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम बीज मंगळवारी (दि. 30) सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलन केले. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी वारकरी समाजाची मुस्कटदाबी अशापद्धतीने किती दिवस करणार आहात? असा प्रश्न सरकारला विचारला आहे. शासनाला आपल्याला वेठीस धरायचे नाही, त्यामुळे आंदोलन थांबवण्यात येत आहे. प्रशासने वारकर्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. नांदेडमधील गुरुद्वारा हा एक दिवस पण बंद नव्हता कारण त्याच्यामध्ये एकी होती. देहू मधील गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांना समजावून सांगितले पाहिजे होते. वारकरी धर्म हा मानवता धर्म पाळतो. दारूची दुकाने चालू आणि त्यांच्याकडून हप्ते घेणार हे कुठल्या मानवता धर्मात बसत, असा सवाल कराडकर यांनी केला. सध्या राज्यात 100 कोटी रुपयांच्या खंडणीचा मुद्दा चर्चेत आहे. कुठल्या मानवता धर्मात बसतो याचे उत्तर पालकमंत्री अजित पवार यांनी द्यावे, असे आव्हान बंडातात्या कराडकर यांनी दिले. येणारी आषाढी वारी पायी होणार का नाही याचे उत्तर द्यावे?, असेही ते म्हणाले. आंदोलन मागे घेण्यापूर्वी देहूच्या वेशीवर बंडातात्या कराडकर यांनी शेकडो वारकार्यांसह भजन सत्याग्रह केला. देहूमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून केवळ 50 जणांच्या उपस्थितीमध्ये बीज सोहळा पार पडणार आहे. देहू आणि आळंदी संस्थाने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे बीज सोहळा पार पडेल, अशी भूमिका घेतली होती. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून बंडातात्या कराडकर एक दोघांसह आले तर त्यांचे स्वागत करू, असे म्हटले होते.
गावाला चहू बाजूंनी पोलीस बंदोबस्त
संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकर्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी बंडातात्या कराडकर यांनी आंदोलनादरम्यान करून त्यांनी शासनाला वेठीस धरायचे नाही, असे म्हणत आंदोलन थांबवले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देहू गावाला चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संचारबंदीही लागू करण्यात आली असल्याने गावाबाहेरील एकाही व्यक्तीला गावामध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.