खोपट्यातील अमेघा घरतची भरारी
उरण : रामप्रहर वृत्त
उत्तराखंड येथे 17 ते 19 ऑगस्ट रोजी होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यात उरण तालुक्यातील खोपटे गावातील दंगल गर्ल अमेघा अरुण घरत उतरणार आहे.
वयाच्या सातव्या वर्षी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रीडा क्षेत्रात आपले करियर घडविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आणि वडिलांकडून प्राथमिक प्रशिक्षण घेणार्या अमेघाने इयत्ता तिसरीमधे असताना धावण्याच्या स्पर्धेत गुरुकुल अकॅडमीमधून पहिले तालुकास्तरीय पारितोषिक मिळविले. त्यानंतर तिने मागे वळून न पाहता धावणे, लांब उडी, उंच उडी, हँडबॉल, गोळाफेक, बुद्धिबळ, स्केटिंग आणि फुटबॉल यांसारख्या खेळांमध्ये घोडदौड सुरू केली. या बहुतांशी खेळांमध्ये अमेघाने आजतागायत शेकडो बक्षिसे आणि पदके मिळवलेली आहेत.
उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाविद्यालयातील खेळ मंत्रालयाकडे मुलींच्या फुटबॉल टीमसाठी काही वाव आहे का, अशी विचारणा अमेघा करीत असताना रूपेश पावसे (नुकतेच नियुक्त झालेले महाराष्ट्र कुस्ती कोच संघांचे मुंबई विभाग उपाध्यक्ष) यांनी अमेघाची शरीरयष्टी पाहून तुला कुस्ती खेळायला आवडेल का? अशी हाक दिली. फक्त एका वर्षात खेळात प्रवीण, तसेच कुशल असलेल्या अमेघाने विद्यापीठातील कुस्तीच्या सामान्यात रौप्यपदक मिळवले, तसेच महाराष्ट्राचा
मानबिंदू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंत 50 किलो या वजनी गटात मजल मारली. पारितोषिकांना गवसणी घालता आली नसली, तरी स्पर्धेतील काही स्तर पार केलेल्या अमेघाने कोठेही न थांबता मेहनत आणि प्रशिक्षणाच्या जोरावर काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या 55 किलो वजनी गटासाठी होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमधे आपली जागा बनवली आहे. याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.