Breaking News

विश्वचषक मल्लखांब स्पर्धा पुढील वर्षी अमेरिकेत

मुंबई ः प्रतिनिधी

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी होणारी दुसरी मल्लखांब विश्वचषक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा आता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत होणार आहे.

मुंबईत 2019मध्ये झालेल्या मल्लखांबच्या पहिल्यावहिल्या विश्वचषकाला खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. यामध्ये भारताव्यतिरिक्त 15 देशांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या समारोपावेळी पुढील विश्वचषक 2021मध्ये न्यूयॉर्क येथे होईल, असे जाहीर करण्यात आले, मात्र जगभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आंतरराष्ट्रीय प्रवासावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाऐवजी हा विश्वचषक पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये खेळवण्यात येईल.

अमेरिका मल्लखांब महासंघाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान स्पर्धेच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय विश्वचषकाच्या दृष्टीने आवश्यक त्या टप्प्यांची माहिती या बैठकीदरम्यान सादर करण्यात आली. यामध्ये मल्लखांब ज्योत, खेळाडूंचे शिबिर आणि पथप्रदर्शन (रोड शो) यांचा समावेश असेल.

दुसर्‍या विश्वचषकात किमान 50 संघांचा सहभाग निश्चित आहे. अमेरिकेतील कोरोनाची स्थिती सध्या सुधारत असून पुढील वर्षांपर्यंत मल्लखांब विश्वचषकाच्या आयोजनाच्या मार्गांतील सर्व अडथळे दूर होतील, अशी अपेक्षा आहे. केंद्र शासन आणि क्रीडामंत्र्यांकडून मल्लखांबाला पाठिंबा मिळत असून लवकरच जिल्हा आणि राज्य पातळीवरील स्पर्धांना प्रारंभ होईल, असे शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply