नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. भारतीय संघाला अंतिम फेरीत विजय मिळवता आला नाही, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बक्षिसाची रक्कम म्हणून तीन कोटी 64 लाख रुपये इतकी मोठी रक्कम खेळाडूंना अद्याप मिळाली नाही. ही रक्कम आता या आठवड्यात दिली जाणार आहे. इंग्लंडमधील टेलिग्राफ या वृत्तपत्राने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या महासंघाच्या एका अधिकार्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षी फेब्रुवार-मार्च महिन्यात झालेल्या टी-20 वर्ल्डकपमधील उपविजेता ठरलेल्या संघातील खेळाडूंना अद्याप बक्षीसाची रक्कम दिले नाही. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. फक्त महिला संघाला नाही तर पुरुष संघातील करार करण्यात आलेले खेळाडू, आंतरराष्ट्रीय मॅच फी, पुरुष आणि महिला संघातील देशांतर्गत मॅच फी या सर्वांना सध्याच्या परिस्थितीत वेळ लागत आहे. करोनामळे देशांतर्गत मार्च महिन्यात संपलेल्या सत्राचे पैसे देण्यास सप्टेंबरपर्यंत वेळ लागतोय, असे बीसीसीआयशी संबंधित एका माजी पदाधिकार्याने सांगितले.
कोरोनामुळे झाला विलंब
बीसीसीआयच्या एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार महिला संघातील खेळाडूंना या आठवड्याच्या अखेरपर्यंत पैसे दिले जातील. याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मला आशा आहे की त्यांना लवकरच बक्षीसाची रक्कम मिळेल. खेळाडूंना पैसे देण्यात विलंब का झाला यावर ते म्हणाले, आम्हाला गेल्या वर्षाच्या अखेरीस ही रक्कम मिळाली होती. गेल्या वर्षी कोरोनामुळे बीसीसीआयचे मुख्यालय बंद होते. यामुळेच पैसे देण्यास विलंब झाला.