टोकियो : वृत्तसंस्था
जपानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत अनिश्चितता वाढू लागली आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत ऑलिम्पिक होणारच, असा दावा जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी केला आहे. जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत दूरचित्रसंवादाद्वारे ते बोलत होते. ‘भविष्यातील विषाणू संसर्गाची तयारी करण्यासाठी आम्हाला धडा मिळाला आहे. गेल्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली तरी यंदा मात्र ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेचे आयोजन होणारच. कोरोना संसर्गावर मानवी विजय संपादन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जागतिक एकतेचे प्रतीक तसेच लोकांमध्ये आशा आणि धैर्य निर्माण करण्यासाठी आम्ही ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणार आहोत,’ असे सुगा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जपानमध्ये लवकरात लवकर कोरोनाचा कहर आटोक्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. सुरक्षित आणि निर्विघ्नपणे ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचे आमचे ध्येय आहे.