पाली : प्रतिनिधी
कोरोना महामारीत मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व घरी बसून अभ्यास केला. मात्र त्यांना क्रीडांगणावर मैदानी खेळ खेळता आले नाही. क्रीडा स्पर्धादेखील झाल्या नाहीत. परिणामी अनेक मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढ व विकासावर परिणाम झाला असून ते अनेक कौशल्यांपासून दूर राहिले आहेत. शिवाय घरात राहून मुले कंटाळलीदेखील आहेत. एकत्र खेळल्यामुळे भावनांचा निचरा होतो, अभ्यासासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, ताण – तणाव कमी होण्यास मदत होते, मानसिक आरोग्य उत्तम राहते, शारीरिक वाढ होण्यास मदत होते, नेतृत्व गुण विकसित होतात, सहकार्याची वृत्ती वाढते, खिलाडू वृत्ती दिसून येते, अपयश पचवण्याची ताकद निर्माण होते, सामाजिक बांधिलकी, मैत्रीची भावना वाढण्यास मदत होते. पण शाळाच बंद असल्यामुळे मुलांना एकत्र येऊन खेळता आलेले नाही. त्याचे दुरगामी वाईट परिणाम येणार्या काही वर्षानंतर दिसून येतील, असे सुधागड तालुक्यातील शिक्षक सत्यवान वाघमोडे यांनी सांगितले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासोबत खेळ असले तर मुले अधिक कार्यक्षम होतात. मात्र कोविड, लॉकडाऊनमुळे मुले दिवसातून दोन तास अभ्यास तर इतर वेळी मोबाईल व टीव्ही पाहण्यात घालवतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर ताण येणे, रात्री लवकर न झोपणे, चिडचिड होणे आदी त्रास संभवतात, असे पालक सोनल निकुंभ यांनी सांगितले. शाळा बंद असल्याने अभ्यास घरीच केला जातो. मुलांना मित्रांसोबत खेळता येत नाही. त्यांना शालेय क्रीडा स्पर्धांना मुकावे लागले आहे. कोरोनाबाबत खबरदारी घेऊन कुठेही जात नाही, असे सुजल वाघपंजे म्हणाल्या.
मानसिक व शारीरिक आरोग्याच्या संतुलनासाठी खेळाचे खूप महत्व आहे. गेले वर्षभर घरात राहून अभ्यास करता आला परंतु, मैदानी खेळापासून आम्ही दुरावलो. माझी यावर्षी जिल्हा क्रिकेट संघात होणारी निवड पुढे ढकलली आहे, त्यामुळे हिरमोड झाला आहे.
-आदर्श सावंत, विद्यार्थी, पाली, ता. सुधागड
सध्या लॉकडाऊन असल्याने मैदानावर खेळता येत नाही. मात्र आमचे प्रशिक्षक ऑनलाइन प्रशिक्षणाद्वारे खेळाडूंना शिकवत आहेत. डिजिटल अॅक्टिव्हिटी सुरू आहेत. फक्त मैदानावरील कौशल्य मिळत नाही. मागील वर्षभरापासून टूर्नामेंटला बंदी आहे. खेळण्यास न मिळाल्याने परिणाम होतो.
-संजय महाडिक, जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड – अलिबाग
खेळातील कौशल्ये आणि त्या खेळामुळे होणारा विकास वेळेवर होणे अत्यंत गरजेचे आहे. -सत्यवान वाघमोडे, शिक्षक