आयसीसीकडून पुरस्कारांसाठी निवड
दुबई : वृत्तसंस्था
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वन डे क्रिकेटर ऑफ द इअर 2019 या पुरस्कारासाठी निवड झाली आहे, तर भारताचा कर्णधार विराट कोहली याची स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
आयसीसीने बुधवारी (दि. 15) 2019मध्ये शानदार कामगिरी करणार्या क्रिकेटपटूंना पुरस्कार जाहीर केले. यात वन डे क्रिकेटर ऑफ इअरसाठी भारताच्या रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. रोहितसाठी 2019 हे वर्ष शानदार ठरले होते. त्याने गेल्या वर्षी वन डे, कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये 10 शतके झळकावली. यापैकी पाच शतके ही इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत केली होती. रोहितने गेल्या वर्षी 28 सामन्यांत 1490 धावा केल्या.
आयसीसीने विराट कोहलीला स्पिरिट ऑफ क्रिकेट हा पुरस्कार दिला आहे. या पुरस्काराची घोषणा करताना आयसीसीने विराटचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. वर्ल्ड कपमधील एका सामन्यात विराट फलंदाजी करीत असताना सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणार्या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला प्रेक्षक चिडवत होते. प्रेक्षकांचे हे वर्तन विराटला आवडले नाही. त्याने हाताने इशारा करीत नाराजी व्यक्त केली आणि स्मिथसाठी टाळ्या वाजविण्यास सांगितले होते.
कसोटीमध्ये गेल्या वर्षी 59 विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स याची कसोटी क्रिकेटर ऑफ द इअर या पुरस्कारासाठी निवड झाली, तर ऑस्ट्रेलियाच्याच मार्नस लबूशेन यांची उदयोन्मुख क्रिकेटपटू पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
दीपक चहरचा विशेष गौरव
रोहित शर्मा आणि विराट कोहली वगळता भारताच्या दीपक चहरला टी-20मधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार जाहीर झाला. चहरने नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात दीपकने हॅट्ट्रिक घेतली होती. टी-20मध्ये भारताकडून हॅट्ट्रिक करणारा तो पहिला गोलंदाज ठरला.