नवी मुंबई : प्रतिनिधी
निसर्ग, तौक्ते चक्रीवादळाने पाच जिल्ह्यातील मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाच्या संसर्गाने आधीच कंबरडे मोडले आहे. जर वादळाने बाधित झालेल्या मच्छीमारांना आता जर अपेक्षित आर्थिक मदत केली नाही तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होईल. म्हणून शासनाला आपण योग्य आर्थिक मदत करण्याचे आदेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन भाजप आमदार रमेश पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मंगळवारी (दि. 25) भेटून दिले. कोकण किनारपट्टीवर आलेल्या तौक्ते वादळाने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यतील हजारो मच्दीमार बांधवांचे सुमारे 250 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मागील वर्षी निसर्ग वादळात 2100 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.त्यावेळी फक्त सहा जिल्ह्यांना शासनाच्या वतीने 65 कोटी रुपये इतकी तोकडी मदत दिली होती. त्यामुळे बर्याच मच्छीमारांना मदत पोहचली नाही. विशेष म्हणजे स्थळ पंचनामा करूनदेखील मदत पोहचली नसल्याने त्यांच्यात आजही नैराश्य असल्याचे राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी निसर्ग वादळात ज्या प्रकारे मच्छीमारांना मदतीचा हात दिला. त्याचप्रकारे तौक्ते वादळाचा फटका बसणार्या मच्छीमारांना मदत केली जाईल असे दूरचित्रवाणी वरून मुख्यमंत्र्यांचे मत समजले, परंतु निसर्ग वादळात दिलेली तुटपुंजी आर्थिक मदत अजूनही शेकडो मच्छीमारांना मिळाली नाही. मग तौक्ते वादळातील मदत कधी मिळेल? राज्य शासनाने एक प्रकारे मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. म्हणून तौक्ते वादळात बाधित झालेल्या मच्छीमारांना समाधानकारक आर्थिक मदतीसाठी आपण पुढाकार घ्यावा, असेही निवेदनातून म्हटले आहे.
राज्य शासनाकडे प्रलंबित असलेला डीझेल परतावा तत्काळ मिळावा, मृत्यू पावलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबांना व बोट नष्ट झालेल्या धारकांस प्रत्येकी पाच लाख रुपये, घरांचे नुकसान झालेल्या व्यक्तींना 25 हजार व बोटींचे थोडेफार नुकसान झालेल्या बोट मालकांना 50 हजार रुपये देण्यात यावेत.
-रमेश पाटील, आमदार, विधानपरिषद, महाराष्ट्र