पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळे, भुस्खलन या नैसर्गिक आपत्ती आहेत. यामुळे झालेल्या नुकसानीचे नैसर्गिक आपत्तीतमध्ये सामावेश होतोे. या नुकसानीचे सरकारमार्फत पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. इतर काही घटना घडल्या तर मात्र ती नैेसर्गिक आपत्ती म्हटली जात नाही. त्यामुळे नुकसानभरपाई दिली जात नाही. समुद्राला येणार्या उधाणामुळे किनारपट्टीवरील गावांमध्ये तसेच खाडीकिनारी असलेल्या गावांमध्ये पाणी शिरून नुकसान होत असते. खारबंदीस्ती फुटल्याने समुद्राचे पाणी शेतात आणि गावात शिरण्याच्या घटना घडत असतात. हल्ली तर अशा घटना वाढत चालल्या आहेत. समुद्राचे खारे पाणी शेतजमीनीत घुसून शेतजमीन नापीक होत आहे. परंतु या नुकसानीकडे शासन लक्ष देत नाही. उधाणांमुळे होणार्या नुकसानीची भरपाई शेतकर्यांना मिळावी, यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हव्यात. समुद्राला येणार्या उधाणांमुळे कोकण किनारपट्टीला दरवर्षी फटका बसतो. उधाणाचे पाणी मानवी वस्त्यांमध्ये घुसू नये तसेच शेतजमीनीचे नुकसान होऊ नये, उधाणापासून संरक्षण व्हावे म्हणून किनारपट्टीवरील भागात खारबंदिस्ती केली जाते. मात्र बंधार्यांची देखभाल योग्य प्रकारे होत नाही. गेले अनेक वर्षे या खारबांधांची दुरूस्ती न केल्यामुळे समुद्राला मोठे उधाण आले की, लाटांच्या मार्यामुळे खारभुमी योजनांच्या बंधार्यांना तडे जातात आणि समुद्र आणि खाडी लगतच्या शेतात समुद्राचे खारे पाणी शिरते. खार्या पाण्यामुळे जमीन नापीक होते. रायगड जिल्ह्यात कृषी विभागाकडून या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील तीन हजार 16 हेक्टर एव्हढे शेतीक्षेत्र उधाणांमुळे कायमचे नापीक झाले आहे. उधाणांमुळे समुद्रकिनार्यावरी तसेच खाडीकिनार्यावरील गावांचे नुकसान होते. मात्र त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. शेतात खारेपाणी शिरल्यामुळे शेतजमीन नापीक होते. तेथील शेतीतून मिळणारे उत्पन्न बंद होते. शेतजमीन नापीक झाल्याामुळे तेथे शेती केली जात नाही. त्यामुळे शेतमजुरांवर बेरोजगारीची समस्या उद्भवते. महत्वाची बाब म्हणजे समुद्राला येणार्या उधाणांचा शासनाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेष होत नाही. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले तरी शेतकर्यांना मदत मिळू शकत नाही. खरं म्हणजे पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळे, भुस्खलन याप्रमाणे समुद्राला येणारे महाकाय उधाण ही नैसर्गिक आपत्ती आहे. पण शासन दरबारी तशी अद्याप नोंद झालेली नाही. यामुळेच कोकणातील शेतकरी मदतीपासून वंचित राहतात. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यात 49 हजार 113 हेक्टर एव्हढे खारभुमी लाभक्षेत्र आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील 21 हजार 296 हेक्टर खारभुमी क्षेत्राचा समावेश आहे. यातील अलिबाग तालुक्यातील तीन हजार 016 हेक्टर खारभुमी क्षेत्र उधाणामुळे कायमचे नापीक झाले आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने समुद्री उधाणांना नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावे, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. परंतु त्याकडे दर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी संबधीत विभागाच्या प्रधान सचिवांना लेखी पत्र पाठवून धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती. मात्र त्यावर अद्याप कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाही.समुद्राला येणार्या उधाणांचा नैसर्गिक आपत्तीत समावेश नसल्याने कोकणातील शेतकरी शासकिय मदतीपासून वंचित राहीले आहेत. दुर्दैवाने कोकणातील लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे गांभीर्य कळलेले नाही. त्याची अलिबाग तालुक्यातील माणकुळे, बहिरीचा पाडा, हाशिवरे, कावाडे, सोनकोठा, रांजणखार डावली, मेढेखार, देहेनकोटी यासारख्या गावांना मोठी किमंत चुकवावी लागली आहे. इतरही गावांमध्येही नुकसान होत असते. ही समस्या केवळ रायगड पुरती मर्यादित नाही. संपूर्ण कोकणाची ही समस्या आहे. समुद्राला उधाण येणे ही नित्याची बाब आहे, असे समजून या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. गेली अनेक वर्षे खारबंदीस्तीची दरुस्ती झालेली नाही. त्यामुळे हे बांध फटून पाणी मानवी वस्त्यांमध्ये घुसते. या खारबंदीस्तींची तातडीने दरुस्ती करायला हवी. जेथे गरज आहे तेथे नवीन बांध बांधायला हवेत. उधाण हे नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करावे. नैसर्गिक आपत्तीचे निकष लावून त्यानुसार नुकसानभरपाई द्यायला हवी. यासाठी काही निकष बदलावे लागतील. त्यासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव आणला पाहिजे.
यंदाच्या मोठ्या भरतीचे दिवस
वार : दिनांक : वेळ : लाटांची उंची
बुधवार : 23 जून : सकाळी 10.53: 4.57मीटर
गुरुवार : 24 जून : सकाळी 11.45 :4.77 मीटर,
शुक्रवार :25 जून : दुपारी 12.33 : 4.85 मीटर,
शनिवार : 26 जून: दुपारी 1.23 : 4.85 मीटर,
रविवार : 27 जून : दुपारी 2.10 : 4.76 मीटर,
सोमवार : 28 जून : दुपारी 2.57 : 4.61 मीटर,
शुक्रवार : 23 जुलै : सकाळी11.37 : 4.59मीटर,
शनिवार : 24 जुलै : दुपारी 12.24 : 4.71मीटर,
रविवार : 25 जुलै : दुपारी 01.07 : 4.73 मीटर
– प्रकाश सोनवडेकर