Breaking News

कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी वैद्यकीय साहित्य, खाटांत वाढ

नवी मुंबई पालिकेचा कृती आराखडा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आरोग्य सुविधा कमी पडल्याने पालिका प्रशासनाने तिसर्‍या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या गृहीत धरून आपला कृती आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये अधिक खाटांची उपलब्धता करण्यात येणार असून वैद्यकिय साहित्याची खरेदी करण्यात येणार आहे.

नवी मुंबई पालिकेच्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला थोपविण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यात खाटांची संख्या दुपटीने वाढविण्यात येणार असून प्राणवायू प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. तसेच लहान मुलांसाठी तीन ठिकाणी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असून त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या 515 खाटा तयार करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. याबरोबरच मनुष्यबळाची कमतरता भासू नये, तसेच लागणारे वैद्यकीय साहित्य खरेदीची तयारीही करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत शहरात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभारल्या आहेत. कोरोना समर्पित रुग्णालय, कोरोना काळजी केंद्र तयार केली असून विविध प्रकारच्या पाच हजार 500 खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत, मात्र कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेतील संसर्गाचा काळ, दैनंदिन रुग्णसंख्या, मृतांची संख्या यात वेगवेगळे अनुभव आले आहेत. पहिल्या लाटेत दैनंदिन सर्वोच्च रुग्णसंख्या ही 447 होती, ती दुसर्‍या लाटेत 1447पर्यंत गेली. तर चार हजार 881पर्यंत मर्यादित असलेली उपचाराधीन रुग्णसंख्या 11 हजार 605पर्यंत गेली.

हा अनुभव पाहता तिसर्‍या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या व उपचाराधीन रुग्णसंख्या ही मोठी असणार आहे, तसेच या लाटेत लहान मुलांना अधिकचा संसर्ग होत त्यांना धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तशी तयारी सुरू केली आहे.

लहान मुलांच्यासाठी पालिकेच्या ऐरोली, नेरूळ, बेलापूर तसेच सिडको प्रदर्शनी केंद्रातील रुग्णालयांत स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहेत. यासाठी 510 खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 300 साध्या तर 200 अतिदक्षता खाटा असणार आहेत. दुसर्‍या लाटेत प्राणवायू तुटवडा निर्माण झाला होता. दैनंदिन गरज भागविताना मोठी कसरत करावी लागली होती. त्यामुळे स्वतंत्र प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शहराची 50 मेट्रिक टन प्राणवायूची गरज यातून सहज भागणार आहे.  खाटांची संख्या दुपटीने वाढविण्यात येणार आहे. सध्या पाच हजार 500 विविध प्रकारच्या खाटा उपलब्ध आहेत. त्या अकरा हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सामाजिक दायित्व फंडातून हे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. आता दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत असलेले मनुष्यबळ कमी न करता कायम ठेवण्यात येणार आहे. त्यांना गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाणार असून काही मनुष्यबळ लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

दुसर्‍या लाटेत कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे तिसरी लाट अधिक मोठी असण्याची शक्यता असल्याने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यक खाटांची संख्या वाढविण्याबरोबर मनुष्यबळ, वैद्यकीय साहित्य खरेदीचे पालिकेचे नियोजन सुरू आहे.

-अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका, नवी मुंबई

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply