पनवेल : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या चबुतर्याची उंची वाढवणे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. याबाबतची आढावा बैठक बुधवारी (दि. 18) महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सभागृहात मंजूर झाला होता. या अनुषंगाने सुशोभीकरणाचे काम करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पुतळा हलविणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबधित संघटना आणि इतरांशी चर्चा करून एकमत घेण्यात आले होते.
महापालिकेच्या वतीने कामास सुरुवात करण्यात आली असून कामाच्या कालावधीदरम्यान पुतळा तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या आंबेडकर भवनात सुरक्षा व्यवस्थेखाली ठेवण्यात येणार आहे. चबुतर्याची उंची वाढवणे आणि परिसराचे सुशोभीकरण या संबधात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार विजय तळेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक लांडगे, उपायुक्त विठ्ठल डाके, कार्यकारी अभियंता कटेकर, संबधित कामाचे सल्लागार व ठेकेदार उपस्थित होते.