पनवेल : बातमीदार – केंद्र सरकारने लागू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व अंत्योदय अन्न योजना लाभार्थी शिधापत्रिका धारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप एप्रिल 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल तहसील विभागातर्फे करण्यात येत आहे.
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत तांदूळ वाटपाला सुरुवात झाली आहे. पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना तांदुळाचे वितरण सुरू झालेले आहे. अन्नधान्यापासून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे तशा सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. पनवेल तालुक्यातील 122 हुन अधिक रेशनिंग दुकानात मोफतचे धान्य देण्यात आले असल्याची माहिती तहसील विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी शिधावाटप दुकानासमोर गर्दी करू नये व शिधापत्रिकाधारकांनी स्वतःहून त्यांचे धान्य सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून प्राप्त करून घेण्याचे आवाहन तहसील विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो एवढा अतिरिक्त धान्य कोटा तीन महिन्यांसाठी मोफत देण्यात येणार आहे.