Breaking News

दुसरी लाट ओसरतेय…

वैश्विक महामारी कोरोनाचा देशात झालेला उद्रेक क्षमताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून मृत्यूदरही घटत आहे. सलग दुसर्‍या वर्षी आलेले कोविड-19 विषाणूचे संकट हळूहळू सरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. आगामी काळात यात अधिक सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

कोरोना या तीन अक्षरी शब्दाने जगात होत्याचे नव्हते केले. गतवर्षी तर या महामारीने अक्षरश: थैमान घातले होते. त्या वेळी या आजाराविषयी कुणाला निश्तिच अशी माहिती नव्हती. आरोग्य यंत्रणा, तज्ज्ञ मंडळीही संभ्रमात होती. मुख्य म्हणजे यावर लस, औषधे उपलब्ध नव्हते. केवळ जास्तीत जास्त काळजी घेणे हेच आपल्या हाती होते, मात्र ते पुरेसे नव्हते. त्यामुळे हा हा म्हणता कोविड-19 विषाणूचा संपूर्ण देशात फैलाव झाला. परिणामी लॉकडाऊन लावण्यात आला. या काळात सार्वजनिक ठिकाणे, रस्ते सामसूम होते तर दुसरीकडे रुग्णालये, क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी होऊ लागल्याचे चित्र पहावयास मिळत होेते. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील चित्र भयावह नव्हते. मृत्यूचा आकडाही आटोक्यात होता, पण यातून बाहेर कसे पडायचे हा प्रश्न होता. अखेर वर्षाअखेरीस कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन सुरू झाले आणि आशेचा किरण दिसू लागला. नववर्षात फेबु्रवारीपर्यंत लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यापूर्वीच पहिल्या लाटेतील रुग्णसंख्या कमालीची घटली होती, मात्र ती वादळापूर्वीची शांतता ठरली. मार्चपासून पुन्हा एकदा रुग्ण प्रचंड संख्येने वाढू लागले. चिंताजनक बाब म्हणजे मृतांचा आकडाही वेगाने पुढे सरकू लागला. त्यामुळे रुग्णालये ओसंडून वाहू लागली. मेडिकलसमोर औषधांसाठी रांगा लागू लागल्या. एवढेच नव्हे तर स्मशानभूमींमध्येही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारांसाठी नंबर लावण्याची वेळ आली. वेदना देणारी गोष्ट म्हणजे अनेक रुग्णांना उपचारांअभावीच आपला जीव गमवावा लागला. बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन उपलब्ध नसल्याने अनेक हकनाक बळी गेले. परिस्थितीच अशी बनली की कुणाच्या हाती काही उरले नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सारे काही वाहून नेले. अखेर दुसरी लाट ओसरू लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या देशातील कोरोनासंबंधीच्या आकडेवारीतून दिलासादायक चित्र दिसत आहे. देशभरात रुग्णसंख्येमध्येे मोठी घट झाली आहे. मृतांचा आकडाही कमी झाला आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाचे दुष्टचक्र दूर होत असताना लागू असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. मग विस्कळीत झालेले जनजीवन, ठप्प झालेले उद्योग-व्यवहार पूर्ववत होणार आहेत. अर्थात, लगेचच संपूर्णपणे सूट दिली जाण्याची शक्यता कमीच आहे, परंतु कुठेतरी नव्याने सुरुवात होऊ शकते. आता नागरिकांनीही पूर्वानुभव पाहता अधिक सजग राहणे आवश्यक आहे. तशी सजगता खासकरून शहरी जनतेने दाखविलेली आहे. त्यांनी लसीकरणास प्राधान्य दिले. विनाकारण फिरण्यावर मर्यादा घालून घातल्या, मात्र ग्रामीण भागातही त्या दृष्टीने जनजागृती गरजेची आहे. कोरोनाला पायबंद घालून आपला देश पुन्हा एकदा हसता-खेळता व्हावा असे सगळ्यांनाच वाटत आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यायला हवे. कोरोनाचे पूर्णत: उच्चाटन होईपर्यंत अतिआत्मविश्वास, अंगलट येईल असे धाडस अजिबात नको. अन्यथा तिसरी लाट अटळ आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply