Breaking News

अवकाळी पावसाचा पाणीटंचाईग्रस्त भागाला आधार

कर्जत तालुक्यातील दरवर्षी जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन या वर्षी संभाव्य पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला होता, मात्र या वर्षी उन्हाळ्यात अनेकदा अवेळी पाऊस आला आणि या अवेळी पावसाने मार्च महिन्यात तळ गाठणार्‍या विहिरींत पाणी साचून राहत होते. दरम्यान, त्यामुळे कर्जत तालुक्यातील 19 गावे आणि 57 वाड्या पाणीटंचाईग्रस्त होत्या, मात्र मे महिना संपत आला असून जून महिन्याच्या उंबरठ्यावर केवळ 24 गावे-वाड्यांत शासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

कर्जत तालुक्यात मार्च महिना उजाडला की दरवर्षी पाणीटंचाई जाणवू लागते. त्यानंतर तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात राहणार्‍या आदिवासी महिलांना थेंबभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. त्यात सोशल मीडियावर यावर व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर अनेक संस्था टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आघाडीवर असतात. त्या वेळी शासनाच्या टँकरची वाट पाहिली जात नाही. प्रत्येक वर्षी शासनाचे टँकर हे मार्च महिन्यात पाणीटंचाई सुरू झाली तरी कधीही मार्च महिन्यात शासनाने सुरू केले नाहीत. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यानंतरच शासनाचे टँकर सुरू होतात. गतवर्षी 1 मे 2020 रोजी शासनाचा पहिला टँकर पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुरू झाला होता. या वर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार 18 एप्रिल रोजी शासनाचा टँकर सुरू झाला आहे, पण जेमतेम पाच गावे आणि 19 आदिवासी वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात आतापर्यंत म्हणजे मे महिना संपत आला असून टँकरच्या संख्येत आणि पाणीपुरवठा करण्याच्या आदिवासी गावे-वाड्यांत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यात येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधन विहिरी खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे, विहिरींमधील गाळ काढणे आणि पाणीटंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करणे यासाठी निधी राखून ठेवला आहे. या वर्षी 17 गावे आणि 59 वाड्या पाणीटंचाईग्रस्त होत्या.तेथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव आल्यानंतर कर्जत तालुका पाणीटंचाई कृती आराखडा यांच्याकडून शासन टँकर सुरू करीत असते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने पिंगळस आणि फणसवाडी येथील विंधन विहिरींची यशस्वी व्यवस्था केल्याने तेथे चांगले पाणी लागले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुरू असलेला टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्याच वेळी मेचकरवाडी, चौधरवाडी, भागूचीवाडी येथील शासनाचे टँकर बंद करण्यात आले आहेत. सध्या मोग्रज, सुतारपाडा, किकवी, अँभेरपाडा या ठिकाणी, तर फणसवाडी, बांगरवाडी, मेंगाळवाडी, टेपाचीवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, धाबेवाडी, पादिरवाडी, विठ्ठलवाडी, चिंचवाडी, मोहपाडा, मोरेवाडी, ताडवाडी, गुडवणवाडी आणि धोत्रेवाडी येथे शासनाचे टँकर सुरू आहेत.

कर्जत तालुक्यात या वर्षी मोग्रज, पिंगळस, धामणी, खांडस, पेठ, भूतीवली, खानंद, अँभेरपाडा, ओलमण, आंत्रट वरेडी, मोहोपाडा, चेवणे, ढाक, नांदगाव, तुंगी, अंतराट नीड यांचा, तर तालुक्यात आनंदवाडी, भगताचीवाडी, काठेवाडी, भल्याचीवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, जांभूळवाडी, बांगरवाडी, पटारवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी, ताडवाडी, पाली धनगरवाडा, आसलवाडी, नाण्यांचा माळ, भूतीवलीवाडी, आसल धनगरवाडा, सागाचीवाडी,धामणदांड, बोरीचीवाडी-कळंब, काळेवाडी, मिरचुलवाडी, चिंचवाडी, अंथराटवाडी, बेलचीवाडी आषाणे ठाकूरवाडी, नागेवाडी, भागूचीवाडी-1, भागूचीवाडी-2, सावरगाव ठाकूरवाडी, हर्‍याचीवाडी, विकासवाडी, ठोंबरवाडी, गरूडपाडा, चिमटेवाडी, विठ्ठलवाडी, मेंगाळवाडी, तेलंगवाडी, कोतवालवाडी, कळकराई, बेकरेवाडी, माणगाव ठाकूरवाडी, स्टेशन ठाकूरवाडी, कोतवालवाडी, नवसुचीवाडी, जांभूळवाडी-वारे, खाड्याचा पाडा मधली वाडी, चाहुचीवाडी, मिरचोलवाडी, नारळेवाडी, भोमळवाडी, दामत कातकरीवाडी आणि नांदगाव विठ्ठलवाडी यांचा समावेश टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात केला होता, मात्र यातील जेमतेम 25 टक्के गावे आणि आदिवासी वाड्यांना शासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे.

या वर्षी नेहमीप्रमाणे पाणीटंचाई जाणवत नाही आणि त्यामुळे प्रामुख्याने आदिवासी आणि दुर्गम भागातील ग्रामपंचायत यांचे टँकर पाहिजे म्हणून प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे आले नाहीत. त्याचे कारण म्हणजे या वर्षी जानेवारी महिन्यापासून अनेकदा तालुक्यात अवेळी पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तळ गाठणार्‍या विहिरी किंवा भूजल क्षमता संपलेल्या विहिरी यांच्या तळाशी पाणी कायम राहिले आणि त्या त्या भागातील लोकांना थेंबभर का होईना पाणी मिळाले आहे. त्याचा दुसरा परिणाम म्हणजे कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी असलेल्या अधिकारीवर्गालादेखील हायसे वाटले आहे.पाण्याची स्थिती गंभीर नसल्याने तालुक्यातील पाण्याची स्थिती आदिवासी आणि दुर्गम भागात चांगली राहिली आणि मोठ्या प्रमाणात शासनाला टँकर सुरू करण्यासाठी धावपळ करावी लागली नाही. याबाबत आदिवासी समाजदेखील खूश असल्याचे दिसून येत आहे. आदिवासी लोक उन्हाळ्यात आपल्या भागातील कोरड्या नद्यांमध्ये डवरे खोदून पिण्याच्या पाण्याची तजवीज करीत असतात. या वर्षी त्यांच्यावर अवेळी कोसळत असलेल्या पावसामुळे ही वेळ आली नाही. चिल्हार नदीमध्ये डवरे खोदण्याचे दरवर्षी दिसून येणारे दृश्य या वेळी अनेक वर्षांनी पहिल्यांदा दिसत नाही. त्यामुळे पाणीटंचाई काळात टँकरने पाणीपुरवठा करणारे प्रशासन खूश आहे. वारंवार होत असलेल्या अवेळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील वीटभट्टी उत्पादक, भाजीपाला उत्पादक आणि लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र पाणीटंचाईमुळे हैराण झालेले ग्रामीण भागातील लोक उन्हाळ्यात कोसो दूर जाऊन सूर्य डोक्यावर असताना पाणी आणावे लागायचे, ही स्थिती त्यांना या वर्षी भोगावी लागली नसल्याबद्दलदेखील आदिवासी समाज खूश असल्याची प्रतिक्रिया आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत शिद यांनी दिली आहे.

कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात या वर्षी पाण्यासाठी कोणत्याही ग्रामपंचायतीवर किंवा कर्जत पंचायत समितीवर आणि तहसील कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले नाहीत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि आदिवासी भागात स्वयंसेवी संस्थांचे टँकर पाणी वाटप करण्यासाठी फिरत असतात. या वर्षी ही परिस्थिती तालुक्यात कुठेही दिसून आली नाही. त्यामुळे प्रामुख्याने कर्जतचे तहसीलदार आणि कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना हायसे वाटले आहे. कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई सुरू झाली की शासकीय टँकर सुरू करण्यासाठी आरडाओरडा सुरू होतो, मात्र या वर्षी शासनाचे तीन टँकर यांना कोणतीही ओढाताण पाणीपुरवठा करण्यासाठी असलेली गावे आणि वाड्या कमी असल्याने करावी लागत नाही. यासाठी या वर्षात पडलेला अवेळी पाऊस मदतीला धावून आला, असेच म्हणावे लागेल.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply