महाड : प्रतिनिधी
महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या कार्यअहवालावर तक्रार करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी सोमवारी (दि. 15) पत्रकार परिषदेत अकलेचे तारे तोडले. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात केवळ पाच जवान शहीद झाले, असा उल्लेख करून दहशतवाद्यांचा खात्मा करताना शहीद झालेल्या 17 जवानांचा या वेळी मलिक यांनी अवमान केला.
26/11 दहशतवादी हल्ल्यावेळी देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला, मात्र आर. आर. पाटील यांचा राजीनामा सांगायला मलिक विसरले, तसेच या हल्ल्यानंतर आम्ही काहीच केले नाही व ती आमच्या आघाडी सरकारची चूक होती, असे त्यांनी कबूलही केले.
अनंत गीते यांच्या कार्यअहवालावर मुद्रक, प्रकाशक आणि संख्येचा उल्लेख नाही, असा आरोप करीत प्रत्येकी 20 रुपये याप्रमाणे छपाई खर्च धरल्यास एक कोटी खर्च झाल्याचा आरोप करताना मलिक यांना त्याचे गणित काही सांगता आले नाही. 23 तारखेला निकाल लागेल, असेही ते बोलले.
आघाडी धर्म काँग्रेसच पाळते, मात्र वेळ आली की तटकरेंची राष्ट्रवादी तो पाळत नाही, असा सवाल पत्रकारांनी केला असता माजी आमदार माणिक जगताप मिश्किलपणे हसत होते.