Breaking News

वेश्वीतील बर्फ कारखाना आणि शीतगृह खातेय धूळ

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यातील वेश्वी येथील तीन कोटी 42 लाख रुपये खर्चाचा बर्फ कारखाना व शीतगृह प्रकल्प गेली 12 वर्षे धूळ खात पडला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा वापर हा काही लोकांनी आपल्या दारू अड्ड्यासाठी बनविला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री अस्लम शेख यांनी सदर प्रकल्पाच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी उरण तालुक्यातील  आगरी, कोळी, कराडी समाजबांधव करीत आहेत.

महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास यांच्या आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय या कारभारामुळे हा प्रकल्प धूळ खात पडला आहे. देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणारा हा व्यवसाय आहे, परंतु या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. त्यामुळे नौका बांधणीसाठी व मत्स्य प्रकल्पासाठी लाखो, कोटींचा निधी उपलब्ध होऊनसुद्धा मत्स्य व्यवसायाला चालना मिळत नाही. त्यात राज्यातील गोड्या पाण्याच्या बंद पडलेल्या 14 मच्छीमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या अगोदर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर  तांडेल यांनी केला होता, परंतु मत्स्य आयुक्तालयात काही अधिकारी हे एकाच जागेवर गेली अनेक वर्षे कार्यरत असल्या कारणाने मत्स्य विभागात होणार्‍या भ्रष्ट कारभाराला हे अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील राजमाता विकास मच्छीमार सहकारी संस्थेसाठी राज्य सरकारने एनसीडीसी योजनेतून 2009 मध्ये बर्फ कारखाना आणि शीतगृह उभारण्यासाठी तीन कोटी 42 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर वेश्वी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत दीड एकर जागेत बर्फ कारखाना आणि शीतगृह प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले, परंतु मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास यांच्या भ्रष्ट कारभारामुळे वेश्वी ग्रामपंचायत हद्दीत उभा राहणारा मत्स्य व्यवसायाचा बर्फ कारखाना व शीतगृह प्रकल्प गेली 12 वर्षे धूळ खात पडून राहिला आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणार्‍या अधिकारी आणि राजमाता विकास मच्छीमार सहकारी संस्थेची चौकशी करावी, अशी मागणी या परिसरातील आगरी, कोळी, कराडी बांधव करीत आहेत.

वेश्वी ग्रामपंचायत हद्दीत उभा राहत असलेला मत्स्य व्यवसायाचा बर्फ कारखाना व शीतगृह प्रकल्प सुरू झाला असता, तर वेश्वी परिसरातील तरुणांना रोजगारांची संधी उपलब्ध झाली असती. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

सोनाली विलास पाटील, उपसरपंच, वेश्वी

सरकारच्या तिजोरीतून खर्च करून उभारण्यात येत असलेला बर्फ कारखाना व शीतगृह प्रकल्प गेली 12 वर्षे धूळ खात पडला असेल, तर या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आलेले तीन कोटी 42 लाख रुपये सरकारने राजमाता विकास मच्छीमार सहकारी संस्थेकडून वसूल करावेत आणि मत्स्य विभागातील भ्रष्ट अधिकारी वर्गाची सखोल चौकशी करावी.

जयवंत कोळी, सामाजिक कार्यकर्ते

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply