शंभरातून एखादाच शूरवीर मनुष्य जन्मतो, हजारांतून एखादाच विद्वान मनुष्य, उत्कृष्ट वक्ता दहा हजारांतून एखादा जन्मतो, परंतु दातृत्वाची संवेदना असणारा दाता हा क्वचितच पाहायला मिळतो. असाच एक दाता, दानशूर व्यक्तिमत्त्व रायगड जिल्ह्याला लाभले, ते नाव म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब! कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूरसाहेब यांचा 2 जून रोजी 70वा जन्मदिवस. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस दरवर्षी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला जातो, मात्र गेल्या वर्षीपासून कोविड-19 विषाणूमुळे जगावर महामारीचे संकट पाहता गोरगरीब व गरजूंना सढळ हाताने मदत करून तसेच कोणत्याही प्रकारचा गाजावाजा, हारतुरे, बॅनरबाजी न करता अतिशय साध्या प्रकारे साजरा केला जातोय. गेल्या वर्षी 26 मार्च ते 22 मे या कालावधीत 61 हजार गरजूंना अन्नधान्य वाटप व मोदी किचनद्वारे सुमारे एक लाख 20 हजार गरिबांना एका वेळच्या अन्नाची तरतूद त्यांनी केली होती. त्यांच्याच वतीने सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, लाखो मास्कची व्यवस्था केली होती. याचेच फलित म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना कोविड देवदूत पुरस्काराने सन्मानित केले होते. समाजकारण व राजकारण करताना ते आपले हलाखीचे दिवस कधीच विसरले नाहीत. गरिबीवर मात करून चिकाटीने व जिद्दीने शिक्षण पूर्ण करून काही वर्षे शिक्षकी पेशा स्वीकारला. एक यशस्वी उद्योजक बनून अनेक शिक्षणसंस्थांवर काम केले. आज लाखो विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडले आहेत. हे सर्व करीत असताना राजकारणातही त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली. आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता व तत्त्वाशी तडजोड न करता स्वाभिमानाने राजकारण केले व आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. अतिशय निस्वार्थीपणे ते कार्यरत आहेत. यापुढेही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून लोकांप्रति कार्य अविरतपणे सुरूच असणार आहे. स्वतःच्या विचारांवर, कृतीवर, क्षमतांवर आणि निर्णयांवर असलेला विश्वास म्हणजे आत्मविश्वास. तो आत्मविश्वास जनतेला देण्याचे काम होत असताना कोरोना संकटाला दूर करण्यासाठी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, असा मौलिक विचार लोकनेते रामशेठ ठाकूर देत असतात. अशा पितृतुल्य, मार्गदर्शक, गरिबांचे कैवारी, अनेकांचे आधारस्तंभ असलेले रामशेठ ठाकूरसाहेबांना माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो व अल्लाकडे दुवा करतो की त्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभू देत…!
–मन्सूर पटेल, ज्येष्ठ नेते, भाजप