Breaking News

लोकसेवक

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी भारतीय संसदेत सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून केलेले काम उल्लेखनीय असे आहे. ते पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षण वारसा घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या रायगड व मुंबई विभागातील सच्चे विकासपुरुष ही त्यांची खरी ओळख आहे. अतिशय सामान्य कुटुंबात पोटाची खळगी भरण्यासाठी कष्टात राहिलेल्या आई-वडिलांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. जगण्याचा संघर्ष करत करतच जीवनाकडे व आजूबाजूच्या समाजाकडे परिवर्तनशील विधायक भूमिकेतून बघण्याची जीवनदृष्टी त्यांनी आत्मसात केली. परंपरागत कष्टप्रद जीवनात अडकून पडण्यापेक्षा शिक्षणाचा मार्ग अनुसरून जीवनाला गती देता येऊ शकते हा विचार त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. पक्षी आपला मार्ग स्वतःहून शोधतात तसे त्यांनी शैक्षणिक दिशा घेऊन जीवन समृद्ध करण्याची जिद्द बाळगली. रयतेच्या स्वप्नांचे शिल्पकार ठरलेल्या कर्मवीर अण्णांचा आदेश डोळ्यांसमोर ठेवून आपले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील काम सुरू ठेवले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व रायगड विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली. त्या जबाबदारीचे कर्तव्य भावनेत रूपांतर करून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल, नवी मुंबई व रायगड आणि राज्यातील इतर अनेक शाखा सोयीसुविधांयुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या सेवाभावी वृत्तीचे सदोदित दर्शन घडवत रयतेचे शैक्षणिक काम म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराचे काम असे समजून सदैव त्यात झोकून देऊन शैक्षणिक प्रगतीची दारे त्यांनी सर्वांना खुली केली. मानवता सेवा आणि स्वावलंबनाचे बाळकडू सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे शिकताना ‘कमवा आणि शिका’ या योजनेत त्यांना मिळाले होते. त्यांची दृष्टी समाजहितासाठी धडपडणारी घार झाली होती व सत्ता हे केवळ सेवेचे साधन मानून शिक्षण क्षेत्रात नवनवीन करण्याचा ध्यासदेखील त्यांचा होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भारतीय संसदेत खासदार म्हणून काम करतानादेखील निरपेक्ष व निस्पृह सेवेच्या भावनेने व कोणताही गर्व मनात न बाळगता समाजाला अभिप्रेत काम केले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मार्ग त्यांनी आपला वैचारिक मार्ग म्हणून अंगीकारला आणि तो मार्ग त्यांना नेहमीच प्रेरणा देणारा ठरला. सर्वसामान्य लोकांचा विचार मनी-मानसी ठेवून समाजहित वृत्तीने भारावून जाऊन काम करणारे व लोकांचे प्रश्न आणि समस्या यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर आता महाराष्ट्रात एक दातृत्वशाली व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित आहेत. एखाद्या तहानलेल्याला पाणी देताना जसा आनंद मिळतो, तसा आनंद त्यांना एखाद्या शाळा, कॉलेजला सुविधा उपलब्ध करून देताना होत असतो. मनाची उदारता ही कृत्रिम कधीच नसते. ती नैसर्गिक व आईवडिलांच्या, गुरुजनांच्या विचार संस्कारांतून आलेली असते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. ते एक नैसर्गिक उदार अंतःकरणाचे लोकसेवक आहेत. त्यांच्या दातृत्वाची व सेवेची पुष्कळ उदाहरणे आहेत. पनवेल व रायगडमधील परिसरात त्यांच्या कामातून त्यांनी जनतेत निर्माण केलेली आपुलकी व जिव्हाळा संस्मरणीय आहे. आयुष्यात काहीतरी लोकांसाठी केले तर त्यात ‘राम’ आहे असे म्हणतात. त्यांच्या नावात ‘राम’ आणि ‘शेठ’ असा उल्लेख आहे, मात्र ते शेठ नावाने कधीच वागले नाहीत, तर प्रभूरामाचा अंश असलेले आणि सामाजिक बांधिलकी कार्याचे ‘शेठ’ माणूस आहेत. कर्मवीर अण्णांचा आशीर्वाद लाभलेले ते एक इतरांना नवजीवन व नवशिक्षण देणारे अनोखे विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला आमचा सलाम. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पुढील आरोग्यदायी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

जयश्री धापते, चिटणीस, भाजप महिला मोर्चा रायगड जिल्हा

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply