तमिळनाडूतील आत्महत्याग्रस्त विद्यार्थिनीला न्याय मिळण्याची मागणी
मुंंबई : प्रतिनिधी
तमिळनाडूमधील बळजबरी धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या एम. लावण्या या विद्यार्थिनीला न्याय मिळण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी मुंबईत सायन सर्कल येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन केले.
तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यात सेक्रेड हार्ट या उच्च माध्यमिक शाळेत शिकणारी विद्यार्थीनी एम.लावण्या हिने विष पिऊन आत्महत्या केली. तिने मृत्यूपूर्वी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की, शाळेतील शिक्षिका रेकलीन मेरी व सगया मेरी यांनी तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करण्यासाठी केलेल्या त्रासामुळे ती आत्महत्या करत आहेत. त्यामुळे एम. लावण्या हिच्या आत्महत्येला जबाबदार असणार्या आरोपींना जामीन मंजूर झाल्यानंतर कारागृहाबाहेर तमिळनाडू सरकारमधील मंत्र्यांकडून आरोपींचे स्वागत करणे, हेदेखील संतापजनक आहे. अभाविपच्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी या तमिळनाडू येथे लावण्याच्या न्यायासाठी आंदोलन करत असताना त्यांना व अभाविप कार्यकर्त्यांना दडपशाही पद्धतीने अटक करण्यात आली.
या घटनेतील संबंधित आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी अभाविपच्या वतीने सायन सर्कल, सायन येथे तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान अभाविप राष्ट्रीय मंत्री प्रेरणा पवार, प्रदेश मंत्री अमित ढोमसे व कार्यकर्त्यांना पोलिसांनी दडपशाही पद्धतीने अटक केली. जो पर्यंत लावण्याला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही लढत राहणार असल्याचे महानगर मंत्री गौतमी अहिरराव यांनी सांगितले, असे अभाविपच्या मुंबई महानगर कार्यालय मंत्री शुभम खरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.