पत्रकारितेत 50 वर्षे सक्रिय असल्याने मानवी स्वभावांचे अनेक नमुने जवळून बघायला मिळाले. बहुतेककरून जास्त माणसं ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ याच वर्गवारीतील अधिक आढळतात. तथाकथित समाजसेवकांमध्ये तर समाजसेवेच्या नावाखाली लोकांच्या तोंडचे तूप आपल्या पोळीवर ओढून कसे घेता येईल हेच बघणारे जास्त भेटतात. स्वत:च्या तोंडचा घास समोरच्या भुकेल्याला देणारा एखादाच! त्यातही असे जे अपवादस्वरूप खरेखुरे समाजसेवक असतात त्यांच्यात गुणग्राहकतेने स्वत:च्या विधायक कार्याला हातभार लावण्यासाठी खर्याखुर्या गुणीजनांना हेरण्याची क्षमता असणे हेही दुर्मीळच असते.
2 जून 2021 रोजी सुफळसंपूर्ण सार्थकतेने सत्तरी पार करीत असलेले रामशेठ ठाकूर हे एक असे गुणग्राहक, रत्नपारखी व्यक्तिमत्त्व! आपल्या अगणित राजकीय, सामाजिक संस्था, शिक्षण, पत्रकारिता, वाहतूक, व्यापार, बांधकामादी सर्वच छोट्या-मोठ्या व्यवसायांशी संबंधित उपयुक्त व्यक्तींची निवड स्वत:च्या आगरी जातीपलीकडे प्रसंगी जाऊन चोखंदळपणे करणारा हा खराखुरा लोकनेता आहे. रामशेठ हे स्वत: पनवेलकर, पण सीकेटी कॉलेज उभारणीत त्याच्या कुशल व्यवस्थापनासाठी पंढरपूरच्या डॉ. सिद्धेश्वर गडदे यांना प्राचार्यपदासाठी बरोबर हुडकणार. अपेक्षेप्रमाणे त्या कॉलेजात प्रवेश घेणे केवळ पनवेल, रायगडच नव्हे, तर अगदी मुंबईपासूनच्या चोखंदळ विद्यार्थ्यांना अभिमानास्पद वाटावे असा दर्जा त्या कॉलेजला या दुकलीने मिळवून देणे मग ओघाने आलेच.
स्थानिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, अपेक्षा यांचे नेमके भान असलेल्या या दुकलीने 14 वर्षांपूर्वी असंच मला नेमकं हेरलं. तत्पूर्वी दहा-बारा वर्षे मी यशस्वीपणे गरवारेमध्ये चालवत असलेल्या पत्रकारितेतील पदविका वर्गाची शाखा सीकेटीमध्ये सुरू करण्याची संधी त्यांनी मला दिली. ती जबाबदारी पार पाडताना रामशेठचे दूरदर्शित्व वरचेवर माझ्या मनावर ठसत राहिलं. एखाद्याला पारखून त्याच्यावर विश्वास टाकून त्याच्या कामात ढवळाढवळ न करण्याची त्यांची सवय मला विशेष भावली. म्हणूनच 2007 पासून 2018-19पर्यंत तो पदविका अभ्यासक्रम आम्ही तिथे यशस्वीपणे राबवू शकलो.
आठवड्याला किमान 12 तास तरी व्याख्याने झालीच पाहिजेत, या विद्यापीठाच्या नियमाला धरून नोकरदार विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आम्ही ते वर्ग केवळ शनिवार-रविवारीच सहा-सहा तास घ्यायचो. त्यामुळे अगदी महाड, अलिबाग, कर्जत, नेरळ, नवी मुंबईपासूनच्या विद्यार्थ्यांनी पनवेलच्या विद्यार्थ्यांसह या वर्गात उत्साहाने प्रवेश घेतला होता. मुख्य म्हणजे त्या सर्वांना पत्रकारच व्हायचं होतं असं नाही. खूप जणांना आपलं भाषिक अध्यापकीय कौशल्य वाढवायचं होतं. आमच्या वर्गातले नितीन तांबोळी, मीरा ठाकूर, देवेंद्र बोडरे हे विद्यार्थी एकाच वेळी कायद्याचाही अभ्यास करीत होते. ते आज वकिलीचीच प्रॅक्टीस करीत आहेत. अरुण उरणकरला परळच्या केइएम रुग्णालयात दूरध्वनी चालकाची कायमस्वरूपी नोकरी मिळाली. ती तो हौसेने करतोय. या सगळ्यांचा अभिप्राय एकच ‘आपला हा अभ्यासक्रम केल्यामुळे समाजात सार्यांशी मिळून मिसळून वागण्या-बोलण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात वाढला.’
वैभव गायकर तिथे ‘लोकमत’चा, कुणाल लोंढे ‘मटा’चा, विराज भागवत ‘सकाळ’नंतर ‘लोकसत्ते’चा, सिद्धेश प्रधान ‘पुण्यनगरी’चा, शैलेश तवटे ‘न्यूज वन इंडिया’चा असे या वर्गाचे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी म्हणून काम बघत आहेत. ज्योती पडवळ, दिनेश हरपुडे, राजेंद्र कांबळे, सुनील कोळी, श्रीकांत वाघचौडे यांसारखे कितीतरी माजी विद्यार्थी मुक्त पत्रकार म्हणून लेखणी चालवत आहेत. सन 2016-17च्या बॅचच्या नम्रता हेमंत कडू या विद्यार्थिनीने तर दोन लहान मुलांना घरी सांभाळायला कुणी नाही म्हणून वर्गात लेक्चरला येताना त्यांना सोबत आणून मागच्या बाकांवर बसवायचं आणि अभ्यास करण्याची तारेवरची कसरत करायची. माझे पत्रकारितेतील गुरू दि. वि. गोखले यांच्या नावे गरवारे-सीकेटी या दोन्ही तुकड्यांतून पहिल्या येणार्या विद्यार्थ्यांसाठी मी ठेवलेला गोखले पुरस्कार या पठ्ठीने त्या वर्षी चक्क उत्तम गुणांनी पटकावला.
सीकेटीतील प्राचार्य गडदेसरांपासून हेडक्लार्क गंगाराम कृष्णाजी सुर्वे, त्यांच्या शेजारच्या केबिनमध्ये बसणारा आतिश हरिश्चंद्र भगत, मीनाक्षी गुरव, मिलिंद किसन साळवे, प्रभृती, अकाऊंट्स विभागातील सर्व कर्मचारी वृंद तो थेट शिपाई संतोष किंजलासकरपर्यंत अगदी कँटीन व्यवस्थापक (कै.) सदानंद अण्णा शेट्टीपर्यंत सारे जण ‘ताई ताई’ करीत मला अगदी सन्मानाने वागवायचे, पण कुठलीही महत्त्वाची जबाबदारी पाट्या टाकत रेटून नेणे हे माझ्या रक्तातच नाही. त्यामुळे गडदेसर रजेवर असल्याचा (गैर)फायदा घेऊन वर्ग बंद करीत असल्याचा विनंतीअर्ज मी परस्पर कॉलेजकडे पाठवला. योगायोगाने दिवाळी अंक स्पर्धेचे बक्षीस समारंभही पुढली चार वर्षे रखडले, पण गतवर्षी चुनाभट्टीवाले आगरी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविणार्या रामशेठनी परत पत्रकारिता वर्गाची टोचणी लावली. योगायोगाने 11 मार्चला कोरोनामुळे पहिला लॉकडाऊन लागला. त्या पाच महिन्यांत त्या पुस्तकाचे सुधारित इंग्रजी रूपांतर म्युझियमसाठी मी तयार करू शकले. मोकळं मोकळं वाटलं. म्हणूनच यंदाच्या 8 मार्चला महिला दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणी म्हणून रामशेठनी पनवेलला निमंत्रित केल्यावर वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मी घेतला.
त्या वर्गाविषयी बोलणी, विद्यार्थी हिताचाच विचार करताना पुनश्च शिक्षणमहर्षि रामशेठचे दूरदर्शित्व जाणवलं. कोरोना महामारीमुळे ओढावलेल्या कमरतोड आर्थिक मंदीमुळे नजीकच्या काळात अनेक गरीब पालकांना आपल्या मुलांना उच्चशिक्षण न देता येण्याचा संभव आहे. त्यामुळे मुद्रितशोधन, भाषांतर, संपादन, वृत्तसंकलन, टीव्ही अँकरींग अशी अनेक व्यावसायिक कौशल्ये एका वर्षात उत्तम, अनुभवी शिक्षकांकडून कमीत कमी शुल्कात शिकवणार्या आपल्या या डिप्लोमा कोर्सला पूर्वीप्रमाणे पदव्युत्तर प्रवेश देण्याऐवजी येत्या शैक्षणिक वर्षापासून किमान बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेश द्यावा, हा त्यांचा प्रस्ताव सर्वमान्य व्हावा असाच होता. हा लोकनेता शिक्षणाचा बाजार मांडून बसलेला शिक्षणसम्राट नाही, तर तो खराखुरा लोकसेवक आहे.
रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाची भेट म्हणून आपला हा विद्यार्थीप्रिय पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम या नव्या शैक्षणिक वर्षापासून सीकेटीत आपण पुनश्च सुरू करीत आहोत. किमान बारावी उत्तीर्ण असलेले, कुठल्याही वयोगटातील स्त्री-पुरुष या वर्गात प्रवेश घेऊ शकणार आहेत. त्यामुळे बहुसंख्येने या नव्या पदविका वर्गाला प्रवेश घ्या आणि रामशेठ ठाकूर यांच्यामधील सच्च्या शिक्षणमहर्षिला 70व्या वाढदिवसाच्या खर्याखुर्या शुभेच्छा द्या!
-सौ. नीला वसंत उपाध्ये, समन्वयक, मराठी पत्रकारिता वर्ग, सीकेटी महाविद्यालय