थेरोंडा ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत; संबंधित खाते झोपेत
रेवदंडा : प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेला रेवदंडा हायस्कुल ते थेरोंडा हा रस्ता गेली तीन वर्षे फलकावरच आहे. ग्रामस्थ नूतन रस्त्याच्या प्रतीक्षेत असून संबंधित खाते झोपले असल्याचा आरोप केला जात आहे.
रेवदंडा हायस्कुल ते थेरोडा रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत करण्यात येत असल्याचा फलक रेवदंडा हायस्कुल येथे लावण्यात आला आहे. मात्र या कामास फारच दिरंगाई झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी सबंधीत खात्याकडे वारंवार केली. मात्र संबधीत खात्याच्या दुर्लक्षामुळे हे काम रखडले असल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत या रस्त्याचे काम केव्हा होणार? असा प्रश्न उपस्थित केला
जात आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या या रस्त्याच्या आराखड्याचा तपशील फलकाव्दारे रेवदंडा हायस्कुल येथे लावण्यात आला आहे. त्यानुसार 2.350 किमी. लांबीच्या या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या देखरेखेखाली 12 महिन्यात पुर्ण करण्याच्या हमीवर ठेकेदाराला देण्यात आले आहे. दरम्यान, रेवदंडा हायस्कुल ते थेरोंडा या मंजूर रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.