मुरूड : येथील समुद्रकिनारी लोखंडी व त्यावर वाहनांचे टायर लावलेली वस्तू वाहून आल्याने स्थानिक नागरिकांत घबराट पसरली होती. सरतेशेवटी तो बोटींना दिशा दर्शविण्यासाठी असलेला बोया असल्याचे स्पष्ट झाल्याने मुरूडकरांचा जीव भांड्यात पडला.
मोठ्या आकाराची वस्तू समुद्रकिनारी आल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकसुद्धा धास्तावले होते. याबाबत तत्काळ मुरूड पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी या वस्तूची बारकाईने पाहणी केली. तत्पूर्वी ही खबर संपूर्ण शहरात पसरल्याने जो तो किनारी येऊन या वस्तूचे निरीक्षण करीत होता.
अखेर मुरूड पोलिसांनी याची संपूर्ण चौकशी केली. याबाबत अधिक माहिती देताना निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले की, दिघी बंदरात मोठमोठ्या बोटी माल घेऊन येत असतात. या बोटींना बंदराचा मार्ग दिसावा यासाठी पद्म दुर्गापासून चकाकणार्या बोयांची रांग आखण्यात आली आहे. रात्रीच्या समयी हे बोये विजेच्या बल्बप्रमाणे चमकतात व बोटींना मार्ग दाखवत असतात. समुद्रात मोठी भरती असल्याने यातील एक बोया व आणखी एक भाग निसटून मुरूडच्या किनारी आले. यासंदर्भात आम्ही दिघी बंदरातील अधिकारिवर्गाशी संपर्क साधला असून, लवकरच ते संबंधित सामग्री घेऊन जाणार आहेत.