Breaking News

सुधागड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा

किल्ल्याचे रूप पालटणार; पर्यटन वाढीसह रोजगार वृद्धी

पाली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड किल्ल्याला आता राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार आहे. यामुळे किल्ल्याचे रूप पूर्णपणे  पालटणार आहे. तर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व गडदपणे अधोरेखित होणार आहे, तसेच पर्यटनवाढीसह तालुक्यात रोजगार वृद्धी देखील होईल. याबरोबरच येथील देदिप्यमान इतिहास उजेडात येणार आहे. यामुळे स्थानिकांसह इतिहास अभ्यासक व दुर्गप्रेमी सुखावले आहेत.

महाराष्ट्रातील काही किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी 5-6 किल्ले निवडण्यात आले आहेत. पथदर्शी स्वरूपात हे किल्ले निवडून या किल्ल्याचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी एक समिती देखील नेमली आहे.

कोकणातील सुधागड, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या तीन किल्ल्यांचा त्यात समावेश आहे. त्यातील रायगड जिल्ह्यातील सुधागड हा एकमेव किल्ला निवडण्यात आला आहे. त्यातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे किल्ले केंद्राने संरक्षित केले आहेत. मात्र सुधागड किल्ला अजूनपर्यंत असंरक्षित असल्याने त्याला संरक्षित केले जात आहे. त्यानुसार राज्य सरकारने राज्य पुरातत्त्व विभागास सुधागड किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार राज्य पुरातत्त्व विभागाने मंत्रालयात नोटिफिकेशन पाठविले आहे. सुधागड किल्ल्याचा जतन दुरुस्ती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने राज्य पुरातत्त्व विभाग सहाय्यक संचालक विलास वाहणे व त्यांच्या टीमने सुधागड किल्ल्याची तेथील वास्तू व जाणार्‍या मार्गांची पाहणी केली.

सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यावर लवकरच किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात येणार आहे, असे विलास वाहणे यांनी सांगितले.

किल्ला संरक्षित झाल्यास किल्ल्याचा इतिहास सर्वांसमोर येईल. पर्यटन विकासाला चालना मिळेल. त्याद्वारे आपोआप सुधागड तालुक्याचा विकास साधला जाईल.

-दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड

सुधागड किल्ल्याला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. किल्ला संरक्षित झाल्यास येथील इतिहास सर्वदूर पोहचेल, तसेच पर्यटनवाढीला चालना मिळेल. रोजगार निर्मिती होईल.

-उमेश तांबट, मालक, सुधागड ट्रेकर्स

किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी नोटिफिकेशन काढण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठविला आहे. प्रथम नोटीफिकेशन निघाल्यानंतर कोणी हरकती घेतल्या नाही, तर फायनल नोटिफिकेशन निघेल व साधारण 2-3 महिन्यांत सुधागड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात येईल व पुढील कामांना सुरुवात होईल.

-विलास वाहणे, सहाय्यक संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply