पाली : प्रतिनिधी
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्याला तब्बल 240 किमीचा विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. यासह समृद्ध निसर्ग व जैवविविधता बहरली आहे. पश्चिम घाटाचा बराचसा भाग हा रायगड जिल्ह्यातून जातो. विशेष म्हणजे अनेक लुप्त होणार्या प्राणी व वनस्पतींच्या प्रजातींसह राज्य फूल, राज्य पक्षी, राज्य प्राणी व राज्य फुलपाखरू यांचे वास्तव्य येथे पहायला मिळत आहे. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेसाठी नंदनवन ठरत आहे. परिणामी निसर्ग पर्यटनासाठी येथे हक्काचे आंदण आहे. येथील पशुपक्षी व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी 10 वर्षाहून अधिक काळ केलेला अभ्यास व निरीक्षणावरून अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आणल्या आहेत. त्यांना येथे दुर्मीळ प्रजातीच्या विविध पक्ष्यांचे दर्शन झाले आहे. यात थोरला धनेश (Great Pied Hornbill ), मलबारी धनेश (Malabar Pied Hornbill), राखी धनेश (Indian Greay Hornbill ), मलबारी करडा धनेश (Malabar Grey Hornbill ) यांचा समावेश आहे. तसेच दुर्मीळ पांढर्या पाठीची गिधाडे व भारतीय गिधाडे येथे आहेत. या पक्ष्यांबरोबर आणखी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रायगड जिल्ह्यात महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल (Yellow footed green-pigeon), महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू (Indian giant squirrel) आवाज करत करत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत फिरताना दिसून येतो. तर महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू ब्ल्यू-मॉरमॉन हेदेखील येथे आढळून येते. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल ज्याला ताम्हण किंवा मोठा बोंडारा या नावाने ओळखले जाते, हे गुलाबी रंगाचे फूल रखरखत्या उन्हात आपल्या सौंदर्याने लक्ष आकर्षित करून घेते. चोसिंगादेखील येथील जंगलात आढळतो. बिबट्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. औषधी वनस्पती व देशी झाडे यांचे प्रमाणदेखील जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पहायला मिळते. विशेष म्हणजे औद्योगिकीकरणामध्ये देखील येथील जैवविविधता टिकून आहे. जिल्ह्यातील पर्यावरण अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात पश्चिम घाटातील वनस्पतींच्या 159 प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. उदाहरणार्थ खांडवेल तोरण, कोरांटी तसेच 29 एक प्रकारचे पक्षी पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ आहेत. उदाहरणार्थ मलबारी व राखी धनेश, निलगिरी रानपारवा, करड्या डोक्याची मैना, पांढर्या गालाचा कुटूरगा आदी. भविष्यात हा अनमोल ठेवा असाच समृद्ध ठेवायचा असेल, तर त्याचे संवर्धन आणि जतन करण्याची गरज आहे, असेदेखील प्रवीण कवळे यांनी आवर्जून सांगितले आहे.
पश्चिम घाट निसर्ग व जैवविविधतेने नटलेले आहे. त्यामुळे देशातील एक नैसर्गिक समृद्धीने नटलेला जिल्हा आहे. येथे अनेक दुर्मीळ प्रजातीचे जीव व वनस्पती सापडतात. वनविभाग तसेच निसर्गप्रेमी संस्था व पर्यावरणप्रेमी यांच्यामुळे येथील अमूल्य ठेवा टिकून आहे.
-समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, सुधागड