Breaking News

आदिवासींची पाण्यासाठी पायपीट; कर्जतमधील मोरेवाडी, ताडवाडी ग्रामस्थांची परवड

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील मोरेवाडी आणि ताडवाडी येथील आदिवासी लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. पावसाळा संपताच लगेचच येथील महिलांना पाण्यासाठी मातीच्या बंधार्‍यावर जावे लागत आहे. त्यासाठी या आदिवासी महिलांना पुरुषांची मदत घ्यावी लागत असल्याने पाण्यासाठी येथील आदिवासी लोकांचा रोजगारदेखील बुडत आहे. कर्जत हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. दुर्गम भागात राहणार्‍या तालुक्यातील आदिवासी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षानंतरही सुटू शकलेला नाही. पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी आणि मोरेवाडी या आदिवासीवाड्यांमध्ये एकूण 900 लोकवस्ती आहे. या वाड्यांमधील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी गावंडवाडी येथील मातीच्या धरणावर जावे लागत आहे. हा मातीचा बंधारा मोरेवाडीपासून किमान दीड किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे या आदिवासी महिलांना तीन किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. या वाड्यांसाठी चार वर्षांपूर्वी नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे, या योजनेचे दोन वेळा भूमिपूजनही करण्यात आले, मात्र पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. या आदिवासी वाड्यांमधील पाणीपुरवठ्याकडे शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी महिला ग्रामस्थ विमल आगीवले यांनी केली आहे. ताडवाडीमधील लोकांसाठी दोन विहिरी आहेत, पण मोरेवाडीसाठी तशी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे या वाडीमधील महिलांना गावंडवाडी येथील मातीच्या बंधार्‍यावर जावे लागत आहे, ही समस्या नळपाणी योजना झाल्याशिवाय सुटणार नाही, मात्र वाडीसाठी मंजूर असलेली नळपाणी योजना कागदावर आहे, ती पूर्ण व्हावी यासाठी वाडीमधील कार्यकर्ते सुरेश दरवडा यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply