Breaking News

माथेरानमध्ये मिशन ‘कमळ’

जेमतेम 3200 मतदार असलेल्या माथेरानमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठ्या मतांचे पाकीट मिळणार नाही, याची जाणीव सर्वांना आहे. मात्र मुंबईच्या जवळ आणि शासनाचा अंकुश असलेले पर्यटनस्थळ आपल्या हाती राहावे यासाठी सर्व राजकीय पक्ष माथेरान नगरपालिकेची सत्ता मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत असतात. या वर्षीच्या अखेरीस माथेरान नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्या दृष्टीने भाजपने येथील पक्ष कार्यकर्त्यांना बळ देण्याचा निर्धार केला असल्याचे मागील काही दिवसातील घडामोडीवरून स्पष्ट होत आहे. सत्ताधारी शिवसेनेचा त्याग करून 10 नगरसेवक नुकताच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ऐन मोक्याच्या वेळी सत्तेत असलेले 10 नगरसेवक आपल्या पक्षात घेण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न काय असतात हे भाजपच्या नेत्यांनी सर्व राजकीय पक्षांना दाखवून दिले. भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी आपल्या मित्रत्वाच्या संबंधाने त्या नगरसेवकांना भाजपच्या महासागरात सामावून घेण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले. माथेरानच्या राजकारणात काही घराणी किंवा कुटुंब यांचा कायम बोलबाला राहिला आहे. त्यात चौधरी कुटुंब कायम सतेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. सत्तेत असलेल्या दोन्ही चौधरी यांनी शिवसेनेचा त्याग करून भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यातील आकाश चौधरी हे उपनगराध्यक्ष आहेत, पण त्यांनी शिवसेनेचे प्रमुख म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडली आहे, अशा कार्यकर्त्यांने पक्ष सोडावा, ही सेनेच्या नेत्यांना विचारमंथन करायला लावणारी बाब आहे. राकेश चौधरी हे नगरसेवक आणि युवासेनेचे आधारस्तंभ होते. निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारे किरण चौधरी हेदेखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. माथेरानच्या राजकारणात सर्वाधिक निर्णायक घटक म्हणून क्षत्रिय मराठा समाजाकडे पाहिले जाते. या समाजाच्या कामात अग्रेसर असलेले तीन प्रमुख नेेते शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.त्यातील दोन माजी नगरसेवक असून एक सेनेचा शहर संघटक तसेच मराठा समाजाचा अध्यक्ष आहे. कुलदीप जाधव आणि प्रदीप घावरे हे दोन माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक भाजपात आल्याने त्या पक्षाचे पारडे जड झाले आहे. जे नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत, ते सर्व कोणत्या एका भागातील नसून शहरातील सर्व विभागाचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. इंदिरा गांधी नगरातील रुपाली आखाडे यांच्या रूपाने त्या प्रभागात भाजपला वरचष्मा ठेवता येईल. पे मास्टर पार्क भागात यापुर्वी भाजपला निसटता पराभव पत्करावा लागत होता. तेथे प्रियांका कदम यांच्या प्रवेशाने भाजप मजबूत झाला आहे. संदीप कदम आणि ज्योती सोनवळे यांच्या रूपाने रोहिदास नगर आणि पंचशील नगरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. नगरसेविका प्रतिभा घावरे, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेविका सुषमा जाधव तसेच कुलदीप जाधव, प्रवीण सकपाळ, किरण चौधरी यांच्यामुळे भाजपला मोठी आघाडी घेणे शक्य होणार आहे. तर शिवाजी महाराजनगर भागातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सोनम दाभेकर आणि राकेश चौधरी भगदाड पाडू शकतात आणि स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव यांना माथेरानच्या राजकारणामधले महत्त्वाचे खेळाडू समजले जाते. माथेरानच्या प्रत्येक भागांत भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र भाजपला मर्यादित यश मिळत होते, परंतु आता निर्णयक यश मिळविण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या भागात विखुरलेले भाजपचे जुने कार्यकर्ते नगरपालिकेवर कमळ फुलविण्यासाठी पेटून उठलेले दिसतात. शहराध्यक्ष विलास पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शैलेंद्र दळवी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सत्तेत असलेला पक्ष सोडून गेल्यानंतर त्यांना पुन्हा पक्षात घेण्याची शिवसेनेने धावपळ केली मात्र भाजपमध्ये प्रवेश केलेला एकही नगरसेवक किंवा कार्यकर्ता पुन्हा सेनेकडे आकृष्ठ झाला नाही. त्यामुळे भाजपने टाकलेले पाऊल आणि मिशन कमळ हे यशस्वी होणार, असा कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. माथेरान वन जमिनीवर वसले आहे, मिनिट्रेन रेल्वेच्या म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय माथेरानमध्ये अनेक विकासकामे करु शकते. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणारे कार्यकर्ते आणि नगरसेवक यांनी दिलेले ’माथेरान विकासाचे मॉडेल’ भाजपच्या राज्य शाखेने केंद्र सरकारच्या माध्यमातून यशस्वी केले तर माथेरानच्या राजकारणात भाजपला पर्याय रहाणार नाही. -संतोष पेरणे

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply