कडापे ग्रामपंचायतीचा आंदोलनाचा इशारा
माणगाव : प्रतिनिधी
पोस्को स्टील कंपनीतील केमिकल मिश्रीत सांडपाण्यामुळे परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. या दुषीत पाण्यामुळे कडापे (ता. माणगाव) सह अनेक ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. पोस्को कंपनीने कडापे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा कडापे ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती मोकाशी व ग्रामपंचायत सदस्या सिमा दबडे यांनी मंगळवारी (दि. 8) माणगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक वसाहतीमधील पोस्को स्टील कंपनीत केमिकलच्या सहाय्याने लोखंडी पत्रे साफ व पॉलीश करतात. त्यानंतर केमिकल मिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट काळ नदीत सोडण्यात येत होते. ग्रामपंचायत आणि प्रसारमाध्यमांनीही हा विषय लावून धरल्यानंतर हे केमिकल मिश्रीत सांडपाणी कंपनीतील रस्ते आणि गार्डनमध्ये सोडून जमिनीत जिरवले जात आहे. ते झिरपून परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत दुषीत झाले आहेत. कडापे ग्रामपंचायतीने वेळोवेळी या पाण्याचे नमुने तपासले असून ते पाणी पिण्यास योग्य नाही, असे अहवाल प्राप्त झाले आहेत.
कडापे ग्रामपंचायत या जलप्रदुषणासंदर्भात पोस्को कंपनी व्यवस्थापन, संबधीत शासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी व पाठपुरावा करीत आहे. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. या प्रकरणी हरित लवादाकडे याचिका दाखल करणार असल्याची माहिती सरपंच मारुती मोकाशी यांनी या वेळी पत्रकारांना दिली.
पोस्को कंपनीने कडापे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना स्वखर्चाने किंवा एमआयडीसी मार्फत शुध्द पाणीपुरवठा करावा, अन्यथा कंपनीसमोर उग्र आंदोलन करू, वेळप्रसंगी आत्मदहनही करू असा इशारा सरपंच मारुती मोकाशी व ग्रामपंचायत सदस्या सिमा दबडे यांनी या वेळी दिला.