पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात रविवार (दि. 26) रोजी 0-5 वयोगटातील बालकांसाठी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली. या वेळी 44 हजारांहून अधिक बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात आले.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 येथे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेंतर्गत 0-5 वयोगटातील बालकांना सकाळी 9.00 ते 5.00 या वेळेत विविध ठिकाणी लसीकरण करण्यात आले. महापालिका कार्यक्षेत्रात रेल्वे स्टेशन, बस स्थानक, सहा नागरी आरोग्य केंद्र, तसेच शहरात ठिकठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्र उभारले गेले होते. पनवेल कार्यक्षेत्रात एकूण 326 पोलिओ लसीकरण केंद्रावरती 44 हजारांहून अधिक बालकांचे लसीकरण करण्यात आले. याबरोबरच झोपडपट्टी, बांधकाम क्षेत्र, सोसायट्या अशा ठिकाणी बालकांच्या लसीकरणासाठी 41 मोबाईल टीम, 24 ट्रान्झिट टीमच्या सहाय्याने लसीकरण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे सर्व नियम पाळून हे लसीकरण करण्यात आले.
आयपीपीआय अंतर्गत ज्या बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण राहिले आहे. अशा बालकांना घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. पुढील पाच दिवस (1 ऑक्टोबर पर्यंत) ज्या बालकांचे काही कारणाने लसीकरण राहिले आहे त्यांनी घरोघरी येणार्या ‘आशा’सेविकांशी संपर्क साधून आपल्या बालकाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.