Breaking News

फ्रेंच ओपेनचा जोकोव्हिच जेता 

पॅरिस ः वृत्तसंस्था
तब्बल सव्वाचार तास झुंज देत चाहत्यांना अविस्मरणीय खेळाचा आनंद देणार्‍या नोव्हाक जोकोव्हिचने ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचे आव्हान पाच सेटमध्ये परतवून लावत फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. जोकोव्हिचचे हे यंदाच्या मोसमातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. महान टेनिसपटू ब्योन बोर्ग यांच्या हस्ते त्याला विजेतेपदाचा करंडक देऊन गौरवण्यात आले.
ग्रीसचा 22 वर्षांचा टेनिसपटू त्सित्सिपास आणि जगातील प्रथम क्रमांकाचा सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सुरुवातीचे दोन सेट गमावलेल्या जोकोव्हिचने उर्वरित सामन्यात सर्व अनुभव पणाला लावत पुनरागमन केले. पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात जोकोव्हिचने त्सित्सिपासला 6-7, 2-6, 6-3, 6-2, 6-4 असे हरवत फ्रेंच ओपनचे दुसर्‍यांदा जेतेपद पटकावले.
राफेल नदाल, रॉजर फेडरर याआधीच स्पर्धेबाहेर झाल्याने जोकोव्हिचसाठी फ्रेंच ओपनचा अंतिम सामना सोपा जाईल असेल वाटत होते, मात्र युवा त्सित्सिपासने त्याला बरेच थकवले. तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या सामन्यात त्सित्सिपासने झुंजार कामगिरीचे प्रदर्शन केले. सुरुवातीचे दोन सेट मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर त्सित्सिपासचा आत्मविश्वास दुणावला होता, मात्र जोकोव्हिचने तिसर्‍या सेटमध्ये आक्रमक खेळ करीत 6-3 असा सेट जिंकला. त्यानंतर पुढच्या दोन सेटमध्ये त्सित्सिपासने चुका केल्या, ज्याचा फायदा जोकोव्हिचने उचलला. अंतिम सेटमध्ये त्सित्सिपासने पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला.
जोकोव्हिचचे हे फ्रेंच खुल्या स्पर्धेचे दुसरे तर कारकिर्दीतील एकूण 19वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. सर्वाधिक 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवणार्‍या राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यापेक्षा तो एका ग्रँडस्लॅम जेतेपदाने मागे आहे. त्याचबरोबर कारकिर्दीत चारही ग्रँडस्लॅम जेतेपदे किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पटकावणारा जोकोव्हिच हा खुल्या पर्वामधील पहिला टेनिसपटू ठरला आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेची नऊ, विम्बल्डनची पाच, अमेरिकन स्पर्धेची तीन आणि आता फ्रेंच स्पर्धेची दोन जेतेपदे त्याच्या नावावर आहेत.

Check Also

दिघाटीत आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त दिघाटी येथील महायुतीच्या प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी …

Leave a Reply