Breaking News

वरळी कोळीवाड्यातील स्थानिकांनी बंद पाडले कोस्टल रोडचे काम

आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका

मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेना आणि मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या प्रकल्पाला वरळीतील मच्छीमारांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. स्थानिकांनी शनिवारी (दि. 30) राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करीत कोस्टल रोडचे काम बंद पाडले.
कोस्टल रोड प्राधिकरणाने समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारीस अडचण येत आहे तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून ठेवल्याने मच्छिमारांच्या जाळ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी शनिवारी भर समुद्रात काम सुरू असलेल्या बार्जवर जाऊन ते बंद पाडले. मच्छिमारांची एकही मागणी मान्य न करीत मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करीत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे.
या वेळी मच्छीमारांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आहेत. त्यांना पर्यावरणाचे काही माहिती आहे का? आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आम्हाला कोण एक दिवस पाहायला येत नाही. निवडून येतात आमच्या इथून आणि मदत दुसरीकडे करतात. असे कसे चालेल? आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वांना घेऊन येतो. तुम्ही तुमचा प्रकल्प करा आणि आम्हाला मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
याआधी मच्छिमारांनी समतोल भूमिका घेत याबाबत स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली होती, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याने आता मच्छिमारांनी तीव्र भूमिका घेतली आहे. जोपर्यंत मच्छिमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोस्टल रोडचे काम बंद करण्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे वरळी कोळीवाड्यात वातावरण चिघळले होते. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि आरसीएफ पथक तैनात करण्यात आले होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply