उरण : वार्ताहर
देशासह संपूर्ण जगावर कोरोन विषाणूच्या साथीने हाहाकार माजविला आहे. साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन केलेले आहे. त्यामुळे आदिवासींचा रोजगार बुडाला आहे. जंगलातून मिळणारा मेवा बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करणारे आदिवासी यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. जंगलातून विपुल प्रमाणत करवंदे, जांभळे, फणस, काजू इत्यादी रानमेवा मिळतो. अतिशय चवदार, आरोग्यासाठी पौष्टिक व स्वस्त हा मिळणारा रानमेवा फेब्रुवारी ते मे पासून जून महिन्याच्या अखेरपर्यंत या काळात विकला जातो तयार होतो. दर्यात, डोंगरात हा रानमेवा स्थानिक आदिवासी, कातकरी जमा करतात व शहरात जाऊन विकतात. झाडांच्या पानात वाटे करून दहा रुपयांना वाटा विकला जातो. शहरातील नागरिक अत्यंत आवडीने हा रानमेवा खरेदी करतात. यातून आदिवासी महिला व कुटुंबांना या दिवसात रानमेव्यापासून चांगली कमाई होऊन दिवसाला तीनशे ते चारशे रुपये मिळतात. त्यातून घरातील कुटुंबियांसाठी समान सामुग्री आदिवासी लोक खरेदी करीत असतात त्यातच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. लॉकडाऊनमुळे या काळात तयार झालेला रानमेवा मागणी नसल्यामुळे व बाजारपेठ बंद असल्याने खराब होत आहे. करवंदे, जांभळे इत्यादी फळे नाशिवंत असून तयार झाल्यावर दोन ते तीन दिवसत खराब होतात. त्यामुळे ती लगेच विकावी लागतात. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद झाल्याने रानमेवा मागणी अभावी स्थानिक आदिवासी, कातकरी भगिनींचा हक्काचा रोजगार बुडाल्याने मोठी नाराजी कुटुंबातून दिसून येत आहे.