Breaking News

पोलादपुरात नळपाणी योजनांच्या नियोजनाअभावी पाणीटंचाई

पोलादपूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून नळपाणी योजनांमध्ये पाणी मुरतंय, अशी परिस्थिती राजकीय ठेकदारी आणि टक्केवारीच्या व्यवस्थेमुळे झाली असून भर उन्हाळ्यात पाणीटंचाई भीषण रूप धारण करीत असताना अनेक योजनांची अवस्था खडखडाट अशीच आहे. दुरुस्तीचे प्रस्ताव आहेत, पण योजना बंद आहे. प्रस्तावही नाही तरीही बंद आहे. मंजूर आहे आणि प्रगतिपथावर आहे म्हणजेच बंद आहे. अशा सरकारी भाषेमध्ये या अवस्थांचे वर्णन केले जात आहे. येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे काही काळ सुरू झालेले कार्यालय पुन्हा महाड पंचायत समितीच्या आवारात स्थलांतरीत झाल्याने तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांबाबतच्या सरकारी अनास्थेमध्ये वाढ होऊन पाणीटंचाई निवारणाच्या कायमस्वरूपी प्रयत्नांना खीळ बसली आहे. दुसरीकडे, अभियंत्यांच्या मते योजनांचा दरडोई खर्च मर्यादित असताना प्रत्यक्षात पाण्याचा उद्भव आणि योजनेतील अंतरामुळे दरडोई खर्च वाढत असल्याने मंजुरीस अडथळा येत आहे.

पोलादपूर तालुक्यातील वाकण, नाणेघोळ, पितळवाडी, गोळेगणी, बोरघर, वडघर, कामथे, कुडपण बुद्रुक, कुडपण बुद्रुक मधलीवाडी, देवपूर, खडपी, गांजवणे, माटवण, कापडे बुद्रुक, बोरावळे, घागरकोंड, चाळीचा कोंड, महाळुंगे, लहुळसे, तुटवली, परसुले, पार्ले, वझरवाडी, ओंबळी, पैठण-पांगळोली, कोतवाल बुद्रुक, बोरघर उमरठ, काटेतळी, तुर्भे बुद्रुक, सडवली, चोळई, पळचिल, कोतवाल बुद्रुक, साखर खडकवाडी, आडावळे बुद्रुक, कोंढवी, धामणदिवी, भोगाव बुद्रुक, देवळे, करंजे, गोवेले, सडेकोंड, चांभारगणी बुद्रुक, गोवेले साळवेकोंड, गोवेले, सावंतकोंड -पार्टेकोंड, चरई, तुर्भे खुर्द, चांभारगणी बुद्रुक, आंग्रेकोंड, रानबाजिरे, तामसडे-मोरेवाडी, आडावळे, दिवील, मोरसडे, लोहारे, मोरगिरी, मोरगिरी फौजदारवाडी, कोतवाल खुर्द, कोतवाल खुर्द रेवाडी, ढवळे, खांडज, खोपड, केवनाळे, महालगूर, आडाचीवाडी, तुर्भेखोंडा व तुर्भेबुद्रुक अशा जुन्या नळपाणी योजना आहेत, तर रानवडी, गुडेकरकोंड, कुडपणखुर्द, कातळी, भोगाव खुर्द, क्षेत्रपाळ, धारवली, निवे, दाभिळ, किनेश्वर अशा नवीन नळपाणी पुरवठा योजना गेल्या काही वर्षांपासून कार्यान्वित होत आहेत.

पोलादपूर शहरासाठी नवीन विस्तारित नळपाणी योजना ही प्रत्यक्षात दुरुस्तीअंतर्गत असून यासाठी 9.5 किमी पाईपलाईन आवश्यक असताना जुन्या पाईपलाईनपैकी 3.5 किमी पाईपलाईन वापरली जाऊन 6 किमी नवीन पाईपलाईन वापरली जाणार होती. लोकवर्गणी न भरल्याने गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजनाने सुरू झालेल्या या पोलादपूर नवीन विस्तारित नळपाणी योजनेचे काम अद्याप रखडलेलेच आहे. चांभारगणी बुद्रुक येथील नळपाणी योजनेबाबत लोकवर्गणीचा अडसर दूर झाला आहे. पितळवाडीच्या नळयोजनेचे काम पूर्ण झाले असून जुन्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सडवली येथे तात्पुरता पाणीपुरवठा सुरू आहे. केवनाळेतील योजना मेपर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. भोगाव दत्तवाडी येथे ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा पावसाळ्यासह 7 महिने गृहित धरून कार्यान्वित असल्याने तेथे उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई स्वाभाविक आहे. धारवली येथे तात्पुरते वीजमीटर उपलब्ध करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कालवली योजनेचा प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांमुळे अपूर्ण आहे. देवपूरवाडीमध्येही गॅ्रव्हिटीद्वारे पाणीपुरवठा असल्याने उन्हाळा सरताना पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गोळेगणी पिंपळवाडी येथे 8 महिन्यांच्या कालावधीसाठी योजना कार्यान्वित असल्याने तेथेही पाणीटंचाई सुरू होणे शक्य आहे. गोवेले येथे पाणीपुरवठा सुरू आहे. सडेकोंड येथे दुरुस्तीकाम पूर्ण झाले असले, तरी विहिरीचे पाणीच मे अखेरीस आटत असते. साखर देऊळकोंड येथे पुढील आठवड्यात पाणीपुरवठा सुरू करणे शक्य होणार आहे. गोवेले साळवीकोंड येथे पाणी सुरू असले, तरी ग्रामस्थांच्या तक्रारींचाही विचार होण्याची आवश्यकता आहे. निवे येथे बोअरवेल निकामी ठरली आहे. त्यामुळे नव्या विहिरीसाठी प्रस्ताव बारगळला आहे. बोरज येथे जॅकवेलवर उमरठ आणि बोरज गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही गावांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने उमरठसाठी वेगळ्या पाणी योजनेची गरज निर्माण झाली आहे. तुटवली येथे दुरुस्ती पूर्णत्वास गेली आहे. पैठण पांगळोली येथील योजनेचा लाभ दोन्ही गावांना होत असला, तरी पांगळोलीला त्याचा अधिक खर्च सोसावा लागत असल्याची तक्रार खा. गीते यांच्याकडे ग्रामस्थांनी करून वेगळ्या योजनेची मागणी केली आहे. चाळीचा कोंड येथे नळपाणी योजनेचे उन्हाळ्यात पाणी आटते. रानवडी कासारवाडीत उद्भव विहीर सुरू आहे. पाणीपुरवठा जुन्या पाईपलाईनद्वारे पुरेसा नाही. कुडपण खुर्द येथे जॅकवेलचे काम पूर्ण झाले आहे. नळपाणी पुरवठा होत नाही. परसुले, गोळेगणी, भोगाव बुद्रुक येथे पाणी सुरू आहे. क्षेत्रपाळ येथे ग्रॅव्हिटीने पाणी योजना सुरू, मात्र पाइपलाईनचे काम पूर्ण झाले नाही. चरईची पाणी योजना बंद आहे, तर फणसकोंड येथील नळपाणी योजना निधी खर्च होऊनही पूर्ण झाली नसल्याने नव्याने प्रस्ताव केल्यावर महावितरणकडून 15 लाखाचे कोटेशन देण्यात आल्याने येथे केवळ 176 लोकसंख्येच्या मानाने दरडोई योजनेचा खर्च 26 हजार रुपये होत असून 3029 रुपयांपर्यंतची अट असल्याने सोलर पंपाचा पर्याय उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे योजनेच्या खर्चात 12 लाखांपर्यंत घट होण्याची खात्री अभियंते व्यक्त करीत आहेत. महालगूर आडाचीवाडी येथे नवीन विहिरीचे काम पूर्ण झाले असून नवीन योजना सुरू आहे. पार्ले येथे विहीर वाहून गेली. तात्पुरती योजना सुरू ठेवण्यात आली. साखर खडकवाडी येथे 2007 मध्ये विहीर वाहून गेली आहे. वाकण येथे दुरुस्ती सुरू, पण पाणी सुरू नाही. वडघर येथे जॅकवेलचे काम पूर्ण झाले आहे. कामथे येथे मोठी दुरुस्ती आवश्यक आहे. खडपी येथे दुरुस्ती सुरू पण पाणी सुरू नाही. कापडे बुद्रुक येथे काम पूर्ण झाले, तरी चार वाड्यांना वगळण्यात आल्याने तेथे पाणी सुरू नाही. घागरकोंड येथे विहिरीअभावी रानबाजिरे डॅमच्या पात्रातील डोहात पाण्याचा पंप लावून पाणीपुरवठा सुरू आहे. महाळुंगे चार लाख निधी मंजूर, पण काम सुरू असून पाणी नाही. कोंढवी येथे योजना बंद असून नळपाणी योजनेचे पाईप वाहून गेले. धारवली आंग्रेकोंड येथे पाणीसाठा अथवा उद्भव नाही. यंदा ओंबळी येथे विहिरीचे पाणी घटत असल्याने टंचाई निर्माण होत आहे. महाळुंगे येथील योजनेचे इटेंडर मुंबईतील ठेकेदाराने घेतल्यानंतर अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.चोळईची जॅकवेल वाहून गेल्यानंतर नव्याने बांधण्यात आली आहे.

एकूणच, दुर्गम डोंगराळ पोलादपूर तालुक्यात योग्य नियोजनाअभावी योजनांमध्ये मुरणारं पाणी सरकारी तिजोरीवर भार होऊन ग्रामस्थांना ऐन मे महिन्यानंतर पाण्यासाठी वणवण करण्यास भाग पाडणार आहे. एकीकडे सर्व योजनांच्या झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे, तर दुसरीकडे बंद आणि अपूर्ण नळपाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारी ठोस उपाययोजना केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

काय आहे कालवलीतील खाजगी सहकारी तत्त्वावरील पाणी योजना?

पोलादपूर तालुक्यातील कालवली गावामध्ये राजकीय आकसापोटी संपूर्ण कोकणास आदर्शवत असणार्‍या एका पाणी योजनेवर कालवली ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ठरावाद्वारे घातलेल्या बंदीला ही योजना चालविणार्‍या तरुणाने न्यायालयामध्ये आव्हान दिल्यानंतर या प्रकरणाचा निकाल होईपर्यंत या बंदी आदेशालाच न्यायालयाने स्थगिती दिल्याने या नळयोजनेतून गेली 10 वर्षे पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू आहे.

तालुक्यातील कालवली गावात नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव प्रभागात उमेदवारी करण्यासाठी येथे या प्रवर्गातील लोकवस्ती नसल्याने नजीकच्या धारवली गावात वास्तव्यास असलेल्या महिलेची रेशनकार्ड व अन्य कागदपत्रे तयार करून बिनविरोध निवड झाली. यानंतर या महिलेची सरपंच पदावरदेखील निवड झाल्यानंतर या महिला सरपंच गेल्या काही महिन्यांपासून मुंबई येथे वास्तव्यास आहेत. सध्या येथील ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंचांकडून चालविला जात आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply