विकासाची आस सर्वांनाच लागली आहे. हा विकास केवळ आणि केवळ मोदी आणि फडणवीस सरकारच करू शकते यावर सर्वांचाच विश्वास बसू लागला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारखी मातब्बर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला राम राम ठोकत भाजपच्या विकासप्रवाहात सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे भाजप अधिक ताकदवान बनत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे स्थान नेहमीच अबाधित राहिलेले आहे. मोहिते-पाटील घराण्याच्या तीन, चार पिढ्या राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या आहेत. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात स्थान मिळवायचे असेल, तर अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याची साथ ज्या पक्षाला लाभते तेथे त्यांचा विजयच होतो. या वेळी हे मोहिते-पाटील घराणे भाजपमध्ये सहभागी झाल्याने लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये भाजपचाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार हे निश्चित. महिनाभरापूर्वी युवा नेते रणजितसिंग मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीला कंटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्या वेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मात्र भाजपत थेट प्रवेश करण्याचे टाळले होते. आता मात्र बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या जाहीर सभेत विजयदादा प्रथमच भाजपच्या व्यासपीठावर दाखल झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे राजकारणातील सुवर्णमहोत्सवाबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यामुळे आता विजयदादा यांचे भाजपत आगमन झाले असेच म्हणावे लागेल. त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अजित पवार यांनी नेहमीच विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या परिवाराचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्या कार्यपद्धतीला कंटाळून मोहिते-पाटील परिवाराने भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता खर्या अर्थाने दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. कारण गेल्या पाच वर्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात सोलापूर जिल्ह्यात विकासाची चक्रे गतिमान झाल्याचे मोहिते-पाटील यांनी अनुभवले आहे. सत्तेत नसतानाही मोदी आणि फडणवीस सरकार जर आपल्या जिल्ह्यासाठी एवढी विकासकामे करीत असतील, तर सत्ताधारी पक्षात सहभागी झाल्यावर सोलापूर जिल्ह्यात विकासाची गंगा अवतरेल हा विश्वास या नेत्यांना वाटला. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही पक्षप्रवेश करताना आम्ही मोदी आणि फडणवीस सरकारतर्फे सुरू असलेल्या विकासकामांवर प्रभावित झाल्यानेच भाजपत सहभागी झाल्याचे जाहीर केले होते. मोहिते-पाटील यांच्यासारखी अनेक बडी नेतेमंडळी आता विकासाला प्राधान्य देताना दिसत आहेत. केवळ राजकारण करीत बसलो, तर विकासापासून आपण दूरच राहू, अशी त्यांची धारणा झाली आहे. त्यामुळेच विकासाची कास धरणार्या मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपत सहभागी होऊ लागलेली आहे. हे सुलक्षणच म्हटले पाहिजे. कारण महाराष्ट्रात काँग्रेसकडे सत्ता असताना या दुष्काळग्रस्त भागांच्या विकासासाठी म्हणावे तसे ठोस उपाय करण्यात काँग्रेसवाले अपयशीच ठरले. त्यामुळे समृद्धी असूनही विकास न झाल्याने मागासलेपण वाढले आणि त्यातूनच मग हे राजकीय परिवर्तन घडू लागले असेच म्हणावे लागेल.