कळंबोली : प्रतिनिधी – पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खांदा कॉलनी वसाहतीतील नाले, गटारे सफाई, रस्त्यांची डागडुगी तसेच फुटपाथची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. ही सर्व कामे प्रकल्पग्रस्त करत आले आहेत पण यावर्षी कोरोना महामारीचा फायदा उठवत सिडको अधिकार्यांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे, अशी नाराजी पाटील यांनी व्यक्त केली.
पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने खांदा कॉलनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. नाले, गटारे तुडुंब भरून रस्त्यावर व परिसरात घाण पाणी साचून राहिल्याने रोगराई तसेच डेंग्यु व मलेरियासारखे साथीचे आजार पसरत आहेत. आरोग्यविषयक अनेक बिकट समस्या निर्माण होवून नागरिकांचे जीवन धोक्यात येत आहेत. गटारे व नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी होत नसल्याने शहरात पाणी साचून रस्ते घाण पाण्याखाली
जात आहेत.
मोठ्या प्रमाणात माती व कचरा जमा होत असतो, तसेच नालेे व गटारात प्लास्टिकच्या पिशव्या व गाळ साचल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होवून गटारे तुंबली जावून परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. ते पाणी रहिवाश्यांच्या घरांत व दुकानांत शिरत असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गटारात प्लास्टीक पिशव्या व गाळ साचल्याने ती तुंबल्याने शहरात पूरस्थिती निर्माण होते. नाले, गटार सफाई रस्त्यांची डागडुगी व फुटपाथची दुरूस्ती कामे येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त करत आले आहेत आणि तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. पण या वेळी कोरोना महामारीचा फायदा उठवत नवीन पनवेल पूर्व व नवीन पनवेल (प) म्हणजेच खांदा कॉलनी, धाकटा खांदा, व मोठा खांदा येथील रस्ते डांबरीकरण व त्यांची दुरूस्ती, फुटपाथ दुरुस्ती, नालेे, गटारसफाई या सर्व कामाची निविदा झेनिथ कन्स्ट्रक्शन या कंपनीला देवून प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केला आहे.
शहरातील जनतेचा विचार करून ही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने करण्यात यावी, अशी विनंती पनवेल महानगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे.